मालवण : (प्रतिनिधी)
महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन, जिल्हा सिंधुदुर्ग आणि कोरगावकर यांची मालवण टेबल टेनिस अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दीप्ती दवे स्मृती सिंधुदुर्ग जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक ४ जानेवारी रोजी मालवण येथे पार पडणार आहे.
सदर स्पर्धा विविध वयोगटांमध्ये घेण्यात येणार असून, त्यामध्ये १३ वर्षांखालील मुले-मुली (मिश्र), १७ वर्षांखालील मुले-मुली (मिश्र), महिला खुला गट, पुरुष खुला गट तसेच पुरुष दुहेरी या गटांचा समावेश आहे. जिल्ह्यातील उदयोन्मुख तसेच अनुभवी खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळणार आहे.
ही स्पर्धा सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी आपली नोंदणी संस्थेचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर (मो. ९४२१२३६४४६) यांच्याकडे करावी, असे आयोजकांनी कळविले आहे.





