मालवण, दि. प्रतिनिधी :
शिक्षक ही कोणत्याही शाळेची खरी संपत्ती असून, शून्यातून विश्व निर्माण करणारे अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांनी ही संस्था उभारली. त्यानंतर असंख्य व्यक्तींनी या संस्थेच्या देदीप्यमान इतिहासात आपले योगदान दिले. त्या सर्वांच्या परिश्रमांचे फळ म्हणजे आज आपण यशस्वी माजी विद्यार्थी म्हणून उभे आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दातृत्वातून शाळेच्या विकासासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन ‘स्व. डॉ. एस. एस. आजगावकर ताम्रपट’ विजेते डॉ. प्रसाद जनार्दन वायंगणकर यांनी केले.
मालवण एज्युकेशन सोसायटीतर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी येथील अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणाऱ्या ‘स्व. डॉ. एस. एस. आजगावकर ताम्रपट’ वितरण सोहळ्याचे आयोजन मंगळवारी टोपीवाला हायस्कूलच्या रंगमंचावर करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुदेश मयेकर होते. यावेळी संस्था सेक्रेटरी विजय कामत, प्राचार्य लक्ष्मण वळंजू, अॅड. अक्षय सामंत, शैलेश खांडाळेकर, चंद्रकांत सामंत, किशोर पटवर्धन, गुरुनाथ सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावर्षीचा ‘स्व. डॉ. एस. एस. आजगावकर ताम्रपट’ टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ. प्रसाद जनार्दन वायंगणकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच मानपत्र पुरस्कार प्रशांत रवींद्रनाथ खोबरेकर आणि सौ. इरावती किशोर पटवर्धन (पूर्वाश्रमीच्या सुजाता अनंत केतकर) यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सौ. इरावती पटवर्धन यांनी प्रशालेच्या विकासासाठी १ लाख १ हजार रुपयांची देणगी संस्थेकडे सुपूर्द केली.
मानपत्र विजेते प्रशांत खोबरेकर यांनी आपल्या मनोगतात, भावना योग्य प्रमाणात असतील आणि त्यांना योग्य साथ दिली, तर कोणतेही कार्य यशस्वी होते. शाळा, शिक्षक, आई-वडील आणि गुरुजनांचे आशीर्वाद घेतले, तर अपयश येत नाही. चांगल्या कृतीचे फळ योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने मिळते, असे सांगितले. तसेच निसर्गाला सहानुभूतीची नव्हे, तर जपण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मानपत्र विजेत्या सौ. इरावती पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांनी लहान वयातच चांगले संस्कार आत्मसात केल्यास यश निश्चित मिळते, असे नमूद केले.
संस्थाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी विद्यार्थ्यांनी आजच्या सन्मानमूर्ती असलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घ्यावी व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जावे. शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया असून, शालेय जीवनात मिळालेल्या मूल्यांचा योग्य वापर करून भविष्य घडवावे, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात सर्वांगीण नैपुण्य पारितोषिक – मुलगा रोहन साळुंखे, मुलगी संस्कृती नाईक; ज्युनिअर कॉलेज सर्वोत्तम विद्यार्थी – अर्थ कुशे, विद्यार्थिनी – दीप्ती शिंदे; सर्वोत्तम वक्ता – रोशन साळुंखे; सर्वोत्तम खेळाडू – अनुष्का गावडे; सर्वोत्तम चित्रकार – रुद्र खानोलकर; ज्ञानज्योती मुखपृष्ठ स्पर्धा – हायस्कूल गट विजेती अनुष्का गावकर, कॉलेज गट विजेती धनश्री सावंत; प्राथमिक शाळा सर्वोत्तम विद्यार्थी – रिषभ मयेकर, विद्यार्थिनी – आद्या आपटे, खेळाडू – रेचल बुतेलो; जय गणेश स्कूल सर्वोत्तम विद्यार्थिनी – भक्ती दामले; सर्वोत्तम कलाकार – मैथिली गावडे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मयुरा भिसे यांनी केले, तर आभार प्राचार्य लक्ष्मण वळंजू यांनी मानले.






