मालवण (प्रतिनिधी) –
गेले दीड महिना रिक्त असलेल्या मालवण तहसीलदार पदावर अखेर कायमस्वरूपी नियुक्ती झाल्याने प्रशासनात नवचैतन्य निर्माण झाले आहे. गणेश दादासो लव्हे यांनी काल दुपारी मालवण तहसीलदार पदाचा अधिकृत पदभार स्वीकारताच मालवण तालुक्याच्या प्रशासनाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
माजी तहसीलदार वर्षा झाल्टे यांना मुंबई शहर उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मालवण तहसीलदार पदाचा पदभार सोडला होता. त्यानंतर हे पद प्रभारी अधिकाऱ्यांकडे होते. दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शासनाने अनुभवी व कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेल्या गणेश लव्हे यांची मालवण तहसीलदारपदी नियुक्ती केली आहे.
यापूर्वी श्री. लव्हे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी–मलकापूर येथे तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार यशस्वीरीत्या सांभाळला आहे. तसेच मंगळवेढा येथे नायब तहसीलदार म्हणून कार्य करताना त्यांनी महसूल प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाचा अनुभवही त्यांच्या कार्यक्षमतेला अधिक बळ देणारा ठरला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सेवेसाठी दाखल होत असलेल्या गणेश लव्हे यांच्याकडून लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान प्रशासनाची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. महसूल विभागाशी संबंधित प्रश्न, शेतकरी, सामान्य नागरिकांचे प्रश्न तसेच विकासकामांमध्ये समन्वय साधण्याची त्यांची कार्यशैली निश्चितच मालवणसाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर विविध सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी तसेच नागरिकांनी श्री. लव्हे यांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला. अनुभवी, शिस्तप्रिय आणि संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्याचे प्रशासन अधिक गतिमान व जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारे ठरेल, अशी आशा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.





