मालवण | प्रतिनिधी
“वराडकर हायस्कूल कट्टाने शंभर वर्षांच्या शैक्षणिक सेवेतून जो ज्ञानदानाचा आनंद दिला, तो आपल्या पूर्वजांनी अनुभवला आहे आणि शतकानंतर तोच आनंद आपण अनुभवत आहोत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. शाळेच्या उज्ज्वल वाटचालीत सर्वांचे योगदान मोलाचे असून, शंभर वर्षांनंतर मिळालेली नवी ऊर्जा ही शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी निश्चितच कारणीभूत ठरेल. शाळेचा गौरव वाढवण्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे,” असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. कविता शिंपी यांनी केले.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल आणि डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ त्यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष अजय राज वराडकर यांनी भूषवले, तर मालवणचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक व विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार शाम पावसकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, संचालिका स्वाती वराडकर, संचालक महेश वाईरकर, उपसरपंच आबा कामतेकर, वराडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, पर्यवेक्षक महेश भाट यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांचे स्वागत केले.

संस्थेचे अध्यक्ष अजय राज वराडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण त्यांच्या सुप्त गुणांचे दर्शन घडवणारे होते. संस्थेने कट्टा दशक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या शैक्षणिक कार्याची प्रचिती या उत्कृष्ट सादरीकरणातून दिसून आली असून, याचे श्रेय शिक्षकांच्या मेहनतीला जाते. शिक्षकांनी असेच संघभावनेने कार्य करत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी वराडकर हायस्कूलची शंभर वर्षांची शैक्षणिक वाटचाल कौतुकास्पद असल्याचे सांगितले. संस्थेने आजही आपला शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवला असून, त्यामागे पदाधिकारी व शिक्षकांची मेहनत आहे. एखादी संस्था उभारणे आणि ती दीर्घकाळ यशस्वीपणे चालवणे हे आव्हानात्मक असते; यामध्ये वराडकर कुटुंबियांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेऊन जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांसारखी पदे भूषवून शाळेचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी दशावतारी कलावंत अक्षय नाईक, प्रशांत मयेकर, महेंद्र कुडव, बंटी कांबळी तसेच नृत्यदिग्दर्शक अरविंद वराडकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या संस्थेच्या अधिकृत लोगोचे अनावरण शिक्षणाधिकारी सौ. कविता शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पेंडुरकर व सौ. वीणा शिरोडकर यांनी केले. यावेळी तीनही शाखांमधील सुमारे ५०० विद्यार्थ्यांच्या सहभागातून सादर करण्यात आलेल्या ‘दशावतार’ महानाट्याला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला, आणि स्नेहसंमेलनाचा हा सोहळा संस्मरणीय ठरला.






