मालवण (प्रतिनिधी)
आचरा ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आचरा बंदर रोडवरील बागेश्री ओढ्यावर श्रमदानाच्या माध्यमातून कच्चे बंधारे उभारण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून भूजल साठा वाढविण्यासही हातभार लागणार आहे.
पावसाळ्यानंतर वाहून जाणारे पाणी अडवून ते परिसरात साठवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि श्रमदानातून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यांमुळे शेती, विहिरी तसेच परिसरातील पाणीटंचाई कमी होण्यास लाभ होणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
या वेळी सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत अधिकारी पद्माकर कासले, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, चंदू कदम, महेंद्र घाडी, पंकज आचरेकर, बबलू गावकर, ग्रामपंचायत कर्मचारी नरेंद्र परब, पोलीस पाटील विठ्ठल धुरी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.






