मालवण | प्रतिनिधी
मालवण नगरपालिकेच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा म्हणून निवड झाल्याबद्दल सौ. ममता वराडकर यांचे मालवण तालुक्यातील पत्रकारांकडून अभिनंदन करण्यात आले. या वेळी पत्रकारांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मालवणच्या सर्वांगीण विकासासाठी अपेक्षा व्यक्त केल्या.
सौ. ममता वराडकर यांच्या निवडीमुळे मालवणच्या राजकारणात नवा इतिहास घडला असून, महिला नेतृत्वाला नवी दिशा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मालवण शहराच्या विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि समन्वयात्मक कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा तसेच पर्यटन विकास या बाबींना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मालवणच्या विकासात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असून, सकारात्मक टीका आणि सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या अभिनंदनपर भेटीत ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, प्रफुल्ल देसाई, मनोज चव्हाण, कुणाल मांजरेकर, अमित खोत , सौंगधराज बादेकर, प्रशांत हिंदळेकर, भुषण मेथर, आप्पा मालंडकर गणेश गावकर विशाल राणे तसेच अन्य मान्यवर छायाचित्रकार आणि विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सौ. ममता वराडकर यांना फुलांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मालवणच्या इतिहासातील हा क्षण प्रेरणादायी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचा कारभार अधिक गतिमान होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





