मालवण (प्रतिनिधी) –
मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर या उपक्रमशील प्रशालेने विद्यार्थ्यांना कांदळवनाचे शास्त्रीय व पर्यावरणीय महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, या उद्देशाने आचरे गावातील जामडूल या छुप्या बेटाच्या खाडी परिसरात कांदळवन अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले. सुमारे सहाशे एकर परिसरात विस्तारलेल्या समृद्ध कांदळवन परिक्षेत्राचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला.
या अभ्यास दौऱ्यात जामडूल बेटावरील रहिवासी तसेच कोकण स्पर्शचे संचालक ओमप्रकाश आचरेकर व एकनाथ आचरेकर यांनी विद्यार्थ्यांना कांदळवनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कांदळवनातील पक्षी व प्राणीजीवन, जलीय परिसंस्था, मत्स्य प्रजननात कांदळवनाची भूमिका, हवा प्रदूषण व जमिनीची धूप रोखण्यात कांदळवनाचे योगदान, कांदळवनाच्या विविध प्रजाती, राज्य कांदळवन वृक्ष, औषधी उपयोग, नवीन रोपांची निर्मिती प्रक्रिया तसेच कांदळवन संरक्षण कायदा याबाबत सखोल माहिती देण्यात आली.
या निसर्ग शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना भूगोल व विज्ञान विषयाचे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित पूरक ज्ञान मिळाले. जामडूल खाडी परिसरातील निसर्गसौंदर्य व हिरवळ पाहून विद्यार्थी विशेषतः भारावून गेले.
या दौऱ्यात ओमप्रकाश आचरेकर यांनी स्वतः केलेल्या खेकडे पालन व्यवसायाचीही माहिती विद्यार्थ्यांना दिली. खेकड्यांच्या विविध प्रजाती, पालनासाठी आवश्यक बाबी, तसेच खेकड्यांचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील महत्त्व व आर्थिक मूल्य याविषयी व्यावसायिक दृष्टिकोनातून माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण केली.
या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांसोबत ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक डी. डी. जाधव, ज्येष्ठ शिक्षक ए. ए. शेर्लेकर तसेच प्रयोगशाळा परिचर पी. व्ही. खोडके सहभागी झाले होते.






