मालवण | प्रतिनिधी
मालवण एज्युकेशन सोसायटी, मालवण यांच्या वतीने अ.शि. देसाई टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘स्व. डॉ. एस. एस. आजगांवकर ताम्रपट’ वितरण सोहळा मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता टोपीवाला हायस्कूलच्या रंगमंचावर संपन्न होणार आहे. याच कार्यक्रमात ‘स्व. डॉ. एस. के. पंतवालावलकर मानपत्र’ वितरणही करण्यात येणार आहे.
टोपीवाला प्रशालेचे प्रथितयश माजी विद्यार्थी, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्टर तसेच मालवण एज्युकेशन सोसायटीचे दीर्घकाळ चेअरमन असलेले डॉ. श्रीधर शांताराम आजगांवकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९८५ पासून गेली ४० वर्षे प्रशालेच्या एका कीर्तिमान, गुणवंत व यशस्वी माजी विद्यार्थ्याची डॉ. एस. एस. आजगांवकर ताम्रपटासाठी निवड केली जाते.
यंदाचा हा मानाचा पुरस्कार टोपीवाला हायस्कूलचे ख्यातनाम माजी विद्यार्थी मान. डॉ. प्रसाद जनार्दन वायंगणकर यांना सत्कारपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. वायंगणकर हे महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, कामोठे (नवी मुंबई) येथे सामुदायिक वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष असून, गुजरात भूकंप आपत्ती निवारण मोहिमेत राष्ट्रीय व्यावसायिक अधिकारी व पथकप्रमुख म्हणून तसेच राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन प्रकल्पात प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
दरम्यान, २००८ पासून विशेष कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मानपत्र पुरस्कारासाठी यंदा मान. श्री. प्रशांत रवींद्रनाथ खोबरेकर आणि मान. सौ. इरावती किशोर पटवर्धन (पूर्वाश्रमीच्या सुजाता अनंत केतकर) यांची निवड करण्यात आली आहे.
श्री. खोबरेकर हे भारतीय रेल्वेत स्टेशन प्रबंधक म्हणून कार्यरत असून, रेल्वेतील सर्वांगीण कामगिरीबद्दल त्यांना DRM Award प्रदान करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धनातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
सौ. इरावती पटवर्धन या सिव्हिल इंजिनियर व संवेदनशील समाजसेविका असून, त्यांनी मार्केटिंग विभागात असिस्टंट डायरेक्टर म्हणून कार्य केले आहे. Sangali Women’s Wingच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे.
हा कार्यक्रम मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मान. श्री. सुदेश बलवंत मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या ताम्रपट वितरण सोहळ्याला टोपीवाला हायस्कूलचे सर्व माजी विद्यार्थी, संस्थेचे हितचिंतक व मालवणमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सोसायटीचे सेक्रेटरी श्री. विजय प्रभाकर कामत यांनी केले आहे.
दरम्यान, मालवण शहरातील शिक्षण क्षेत्रातील नामांकित श्रीमंत नारायण अनंत देसाई टोपीवाला ज्युनिअर कॉलेज, मालवण या संस्थेच्या स्थापनेला २०२५ साली ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणावर कॉलेजच्या माजी शिक्षकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला गेल्या ५० वर्षांतील ५० हून अधिक माजी शिक्षक, प्राचार्य व शिक्षकेतर सहकारी उपस्थित राहणार असून, १९७५ ते २०२५ या कालावधीतील सर्व माजी विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक व स्नेहपूर्ण सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कॉलेजचे प्राचार्य श्री. लक्ष्मण वसंत वळंजू आणि मालवण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.





