सत्तासुत्रधारांची प्रतिष्ठा पणाला, कौल ठाऊक असलेला मतदारराजा मात्र निर्धास्त
मालवण नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान झाले आणि तब्बल तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर २१ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मतदानानंतर साधारणपणे उलटलेला १८- १९ दिवसांचा कालावधी हा खुप गोष्टी विस्मरणात टाकणारा आहे. एकीकडे निकालाची लगबग असताना नेमकं त्या प्रचाराच्या आठ दिवसांत काय घडले होते त्याचा रिकॅप सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचारादरम्यान दरवेळी विरोधक विरुद्ध सत्ताधारी अशी रंगणारी निवडणूक सत्तेतल्या दोन मित्रपक्षांत एवढी टोकाची बनली की, मालवण नगरपालिकेची निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई न राहता, राज्याचे लक्ष वेधणारी राजकीय प्रतिष्ठा, अहंकार, पुनरागमन आणि अंतर्गत संघर्षांचे रणांगण बनली.
महायुतीतील शिवसेना–भाजप युतीत ही निवडणूक सुरुवातीपासूनच चुरशीची ठरणार, याचे संकेत स्पष्ट होते. शिवसेनेला सत्तेत आम्हीच राहणार ही सांगणारी आणि भाजपाला आपले वर्चस्व अबाधित ठेवण्याचे आव्हान निर्माण करणारी ठरली आहे. तर लोकसभा–विधानसभा निकालानंतर अपयशाच्या गर्तेत गेलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कमबॅकची संधीची दारे किलकीली करुन देणारी ही लढाई होती; तर
चार जागांचा वाद आणि अहंकाराची ठिणगी
भाजपने सुरुवातीला शिवसेनेला केवळ चार जागा देताच महायुतीतील समन्वयाचा मुखवटा गळून पडला. शिवसेनेचा स्वाभिमान दुखावला आणि शेवटपर्यंत युतीसाठी आग्रह धरणाऱ्या शिवसेनेला “स्वतंत्र लढू” ची तलवार उपसावी लागली. मात्र त्यानंतर राजकारणाने रंंग बदलला आणि व्यक्ती, सत्ता समीकरणे आणि पर्दाफाशनिती केंद्रस्थानी आली.
नगराध्यक्ष पदासाठी राजकीय पळवापळवी
नगराध्यक्ष पदासाठी झालेली पळवापळवी ही या निवडणुकीची खरी ओळख ठरली.
- भाजपने उबाठा शिवसेनेच्या शिल्पा खोत यांना पक्षात प्रवेश देत थेट तिकीट दिले.
- भाजपच्या ममता वराडकर यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेच्या दाव्याला पॉवरबुस्टर मिळाले
- उबाठा शिवसेनेने भाजपच्या पूजा करलकर यांना पक्षप्रवेश देत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली.
या उलटसुलट पक्षांतरामुळे मतदार गोंधळला, पण राजकीय रसिक मात्र पुरते तृप्त झाले.
तिरंगी लढत : चुरस वाढली, मतदार सुखावला
तिरंगी लढतीमुळे निवडणुकीतील चुरस कमालीची वाढली. आरोप–प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, सभांमध्ये शब्दांचे बाण सुटले आणि नागरिकांसाठी ही निवडणूक एक प्रकारचे राजकीय मनोरंजन ठरली. आमदार निलेश राणे यांनी शहरविकासासाठी मांडलेली अष्टसुत्री अनेक वर्षांनी शहराचा नव्याने विचार होतेय ही गोष्ट मतदारांपर्यंत पोहोचणारी ठरली. तर भाजपकडून सत्तेत आम्ही आहोत ही बाब निधी विकासासाठी मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाली. त्याचवेळेला स्वच्छ प्रतिमेचे युवा उमेदवार हीच आमची ओळख हा प्रचार अतिशय दमदारपणे उबाठा गटाकडून राबवला गेला.
कॅश फॉर व्होट आणि चक्रव्यूह
कॅश फॉर व्होट प्रकरण, बनावट कास्ट सर्टिफिकेट यासारख्या मुद्द्यांवरून आमदार निलेश राणे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पैशांच्या बॅग दाखवत शिवसेनेने उभा केलेला चक्रव्यूह प्रचाराच्या पातळीवर यशस्वी ठरला, हे नाकारता येणार नाही. या निवडणुकीत आमदार निलेश राणे यांचा आक्रमकपणा एकाच वेळेला भाजपला कोंडीत आणणारा ठरलाच पण त्याचवेळी शहरात पक्षवाढीला मिळालेली नवी ताकद ही अधोरेखित करणारी ठरली.
नवे चेहऱ्यांची पॉवर आणि ज्येष्ठांच्या राजकारणाचा कस
यावेळच्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, शिवसेना उबाठा आणि काँग्रेस हेच पक्ष रिंगणात उतरले असले तरी सर्वांकडून जिंकण्याची ताकद आणि नवीन चेहरे या दोन्ही गोष्टींचा समन्वय राखला गेला. साधारणपण दोन दशकांनतर नव्या चेहऱ्यांची झालेली एंट्री मतदारराजाला खऱ्या अर्थाने मतदानकेंद्रावर नेणारी ठरली. ज्येष्ठ चेहऱ्यांचा विचार करता यावेळी नवमतदार कोणाच्या बाजूने उभा राहतो त्यावर निकालाचा कौल आणि बदललेल्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारी आहे.
निकालाचे चित्र उमेदवारी अर्जावेळीच सुस्पष्ट
मालवण नगरपालिका निवडणूकीचा निकाल दोन तारीखचा एकवीस तारीखला पुढे ढकलण्यात आला असला तरी मागील अठरा दिवसांत कुठलीही न रंगलेली राजकीय चर्चा हा फॅक्टर मतदारांचा अंडरकरंट स्पष्ट करणारा आहे. उमेदवारी देताना आखलेली मतदारांची गणिते ही प्रत्येक प्रभागात विजयाचा गुलाल कोणाचा उडणार यावर शिक्कामोर्तब कऱणारा आहे.
थेट नगराध्यक्षपदांच्या तिन्ही उमेदवारांनी दिली प्रभाग उमेदवारांनाच ताकद
मालवणात या अगोदर झालेल्या दोनवेळच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा इतिहास पाहता यावेळेस तिन्ही पक्षांकडून दिलेले नगराध्यक्षपदाचे चेहरे आपल्या पक्षाला आणि प्रत्येक प्रभागात आपल्या उमेदवाराला पुढे नेण्यात कमालीचे यशस्वी झाले. नगराध्यक्षपदासोबत प्रभागाचेही समर्थन मिळाले पाहिजे हा मुद्दा मतदानादिवशी प्रभावी ठरला त्याचा फायदा निकालात उतरताना नक्की दिसेल. दोन टप्प्यातील मतमोजणी दरम्यान पहिल्या टप्प्यातच खऱ्या अर्थाने दुसऱ्या टप्प्यात विजय कोणाचा असेल याचं चित्र स्पष्ट करेल.
राणे साहेबांची अनुपस्थिती आणि ‘दादा फॅक्टर’
आजवर खासदार नारायण राणे यांच्या नावावर आणि त्यांच्या आदेशावर गाजणारी मालवणची निवडणूक यावेळी त्यांच्या अनुपस्थितीमुळेच चर्चेत राहिली. मात्र याच वेळी ‘दादा फॅक्टर’ वेगळ्याच पद्धतीने कार्यरत झाला—थेट मैदानात न उतरता, पार्श्वभूमीतून प्रभाव टाकणारा.
निकाल काय सांगणार?
२१ डिसेंबरचा निकाल केवळ नगरसेवकांची संख्या ठरवणार नाही; तो
- महायुतीतील ताणतणाव,
- उबाठा शिवसेनेच्या पुनरागमनाची दिशा,
- भाजपच्या स्थानिक ताकदीची खरी चाचणी
यावर भाष्य करणार आहे.
मालवणची ही निवडणूक म्हणजे राजकारणातील सत्ता नायक , राजकीय संधीसाधूपणा आणि जनतेच्या निर्णायक शक्तीचा आरसा आहे. निकाल काहीही असो, या निवडणुकीने मालवणच्या राजकारणाला नवी वळणे दिली, हे मात्र निश्चित.






