मुंबईच्या राजकारणात आकड्यांपेक्षा भ्रम जास्त धोकादायक असतात. सध्याची चर्चा—काँग्रेसने उबाठा गटासोबत आघाडी तोडून स्वबळावर जाण्याची—ही भ्रमाचीच उपज आहे. कारण मुंबईतील वास्तव काँग्रेसच्या मनासारखे नाही, तर मतदारांच्या निर्णयासारखे आहे.
विधानसभा निवडणुकांचे आकडे स्पष्ट आहेत. उबाठा सेनेला मुंबईत ३,४३,५६५ मते (२५.८%), भाजपला ३,२२,५११ (२४.३%), काँग्रेसला २,४३,७५५ (१८.३%), शिंदेसेनेला २,२९,६०६ (१८%) आणि मनसेला सुमारे १.२० लाख (१०%) मते मिळाली. याचा सरळ अर्थ असा—मुंबईत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि ती ताकद स्वतंत्रपणे सत्ता काबीज करण्यासाठी अपुरी आहे.
महत्त्वाचा मुद्दा असा की, ही १८.३ टक्के मते काँग्रेसला ‘स्वबळा’तून नव्हे, तर उबाठा गटाच्या सहकार्यातून मिळाली आहेत. हे वास्तव नाकारून जर काँग्रेसने महापालिका निवडणुका एकटीने लढवल्या, तर फटका काँग्रेसलाच बसेल—आणि फायदा थेट भाजप-शिंदे गटालाच होईल.
मुंबई हे केवळ संघटनांचे शहर नाही, तर करिष्म्यांचे शहर आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे जो भावनिक, सांस्कृतिक आणि राजकीय करिष्मा आहे, तो आज मुंबईतील कोणत्याही काँग्रेस नेत्याकडे नाही. वर्षा गायकवाड यांची ओळख मतदारसंघापुरती मर्यादित आहे. रवी राजा, कृपाशंकर सिंह, संजय निरूपम, मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये नाहीत. भाई जगताप यांचा प्रभाव ठराविक चौकटीतच आहे. परप्रांतीय मतदारांना खेचणारा चेहरा नाही, मराठी माणसाला भावणारा तर एकही नाही—हे कटू असले तरी सत्य आहे.
अशा स्थितीत ठाकरेंपासून फारकत म्हणजे मुंबईत काँग्रेसचे आणखी मरतुकडे होणे. भाजपविरोधी मतांमध्ये फाटाफूट होणार, हे ठरलेले आहे. त्यात मनसेची दहा टक्के मतेही निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे दोन्ही ठाकरेंबरोबर जाण्यातच काँग्रेसचा राजकीय फायदा आहे, हे न समजणे म्हणजे आत्मघात.
इतिहास काँग्रेसला धडा देतो आहे. २०१९ मध्ये राज ठाकरे यांच्या प्रतिमेचा वापर काँग्रेसने मोकळेपणाने केला होता—तेव्हा ‘तत्त्वांचा’ अडसर नव्हता. पण २०२२ च्या दिल्ली महापालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्रपणे लढून काय मिळवले? ‘आप’ला १३४, भाजपला १०४, आणि काँग्रेसला केवळ ९ जागा! ही राजकीय आत्महत्या नव्हे तर काय?
जो शक्तिमान असतो, तो आपल्या दंडातील बेटकुळ्या दाखवतो. पण काडी पैलवानाने वारंवार तथाकथित स्वबळाचे प्रदर्शन करून आपली शोभा का करून घ्यावी? मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व ज्या ताकदीने उतरते, त्या तुलनेत काँग्रेस श्रेष्ठींचे लक्ष कुठे आहे? दिल्लीतील चेन्नीथलांना मुंबईचे काही पडलेले दिसत नाही—हीच खरी शोकांतिका.
आता तरी बाळासाहेब थोरात, भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई यांच्यासारख्या ज्येष्ठांनी दिल्ली गाठून मुंबईतील राजकीय वास्तव श्रेष्ठींना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. अन्यथा काँग्रेसचा ‘हात’ दाखवत उबाठा सोबत आघाडी तोडणे हे भाजपच्या बी-टीमसारखे काम ठरेल—आणि मुंबई काँग्रेससाठी पुन्हा एकदा पराभवाची प्रयोगशाळा बनेल.
प्रश्न साधा आहे—
काँग्रेसला पुन्हा पुन्हा आपले तोंड फोडून घ्यायचे आहे, की शहाणपणाने राजकारण करायचे आहे?
उत्तर मात्र वेळच देईल… पण वेळ फार कमी आहे.





