सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
महिला सक्षमीकरण, सुरक्षा आणि हक्कांच्या दृष्टीने राज्यात आदर्श ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले आदिशक्ती अभियान हे केवळ पुरस्काराभिमुख न राहता सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरावे, असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिला. आदिशक्ती अभियानाचा आढावा घेण्यासाठी १५ डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत त्यांनी ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे सखोल मूल्यमापन करत पुढील दिशा निश्चित केली.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आदिशक्ती अभियानात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्वगुणांकनापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यावर भर दिला. ग्रामपंचायतींनी केलेल्या स्वगुणांकनाची तालुकास्तरीय आदिशक्ती समितीमार्फत प्रत्यक्ष तपासणी करून, तालुक्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. तसेच संबंधित ग्रामपंचायतींना भेटी देऊन भौतिक निरीक्षण करण्यावरही त्यांनी विशेष भर दिला.
बैठकीत आदिशक्ती पुरस्कारासाठी ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आलेल्या स्वगुणांकनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महिला स्नेही वातावरण निर्मिती प्रशिक्षण, सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, तसेच महिला व बालकल्याणाशी संबंधित विविध निकषांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय आदिशक्ती पुरस्कार मिळवून देण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्हा महिला सुरक्षा, महिला हक्क आणि महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत राज्यात अग्रेसर असल्याचे नमूद करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बालविवाह, हुंडा प्रथा व कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या अनिष्ट प्रथांचे प्रमाण जिल्ह्यात राज्याच्या तुलनेत कमी असल्याकडे लक्ष वेधले. हीच सकारात्मक बाब आदिशक्ती अभियानांतर्गत अधिक सक्षमपणे पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिशक्ती अभियानामुळे गावपातळीवर महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि सक्षम वातावरण निर्माण होऊ शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार मिळविण्याची क्षमता असून, त्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी यावेळी केले.
या बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उदय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.व.बा.वि.) मनोज पाटणकर आदी अधिकारी उपस्थित होते.






