मालवण दि प्रतिनिधी
मच्छिमारी हंगामास म्हणावा तसा जोर न आल्याने तळाशील किनाऱ्यावर एका मांगरीत उभ्या करून ठेवलेल्या तेरेकर रापण संघाच्या दोन होड्याना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून या दोन्ही होड्यांसह एक पात तसेच मच्छिमारी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना घडली आहे. जोरदार वाऱ्यामुळे ही आग भडकल्याने मच्छिमारांनी तसेच ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले असून या आगीमुळे तेरेकर रापण संघांचे सुमारे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून ४० मच्छिमार कुटुंबावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ही आग कशामुळे लागली याचे अद्याप कारण समजू शकलेले नाही.
या सबधीचे अधिक वृत्त असे की, मालवण तालुक्यातील तळाशील येथील गोपाळकृष्ण मंदिराशेजारी तेरेकर रापण संघाने रापणीच्या होड्या तसेच मच्छिमारी साहित्यं ठेवण्यासाठी मांगरी बांधली होती. तळाशील येथील तेरेकर रापण हा सर्वात जुना रापण संघ म्हणून ओळखला जातो. या रापण संघात सुमारे ४० मच्छिमार सदस्य आहेत. सध्या मच्छिमारी हंगाम लांबल्याने तसेच काहीसा मत्स्य दुष्काळाचा फटकाही जाणवू लागल्याने तेरेकर रापणकर संघाने रापणीच्या मच्छिमारी व्यवसायासाठी अद्याप सुरुवात केळी नव्हती. जवळपास गत मच्छिमार हंगामात जून महिन्यात मांगरीत ठेवण्यात आलेल्या यां दोन्ही होड्या समुद्रात लोटण्यात आल्या नव्हत्या.

आज सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास तेरेकर रापण संघाच्या मांगरीतून धूर येताना एका पर्यटकास दिसला. त्याने ही घटना अशोक महादेव शेलटकर या मच्छिमारास सांगितल्या नंतर क्षणाचाही विलंब न लावता अशोक शेलटकर यांनी आग विझविण्यासाठी पाण्याचा पंप सुरु करीत आपल्या सहकाऱ्यांना तसेच ग्रामस्थांना हाकाऱ्या मारल्या. मांगरीला आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनीही धाव घेत आग विझविण्याचा जोरकस प्रयत्न केला. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीने भडका घेतला होता. आगीच्या उंचच उंच ज्वाळा आभाळाच्या दिशेने झेपवात होत्या. तर सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते. जिवाच्या आकांताने रापणकर मंडळींसह ग्रामस्थ आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. मात्र त्यांचे हे प्रयत्न अपुरे पडत होते. सुमारे दोन अडीज तासात शर्थीचे प्रयत्न करूनही मांगरीला लागलेली आग विझविण्यात ग्रामस्थांना यश आले नाही.
या आगीत मांगरीतील दोन होड्या, फायबरची पात, दोनशे किलो वजनाची नायलॉनची रोप, होड्या ओढतना वापरल्या जाणारी ६ उंडाले आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. या आगीत सुमारे तेरेकर रापण संघाची २० ते २५ लाख रुपयांची हानी झाली आहे.
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या रापणकर संघाच्या शशिकांत सूर्यकांत आडकर यांच्या नावे असलेली शिवकृपा नावाची होडी तर लक्ष्मण पांडुरंग तारी यांच्या नावे असलेली यशवंती नावाची होडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही आग विझविण्यासाठी तेरेकर रापण संघाच्या सदस्यांसह ग्रामस्थ आणि मच्छिमारांनी शर्थीचे प्रयत्न केले. ही आग कशामुळे लागली याचे अद्याप कारण समजू शकलेले नाही.

तेरेकर रापण संघ हा तोंडवळी तळाशील किनारपट्टीवर सर्वात जुना रापण संघ म्हणून ओळखला जातो. या रापण संघात सुमारे ४० कुटुंबांचा सहभाग आहे. रापणीची मासेमारी हे या कुटुंबांचे उत्पन्नाचे साधन असून या आगीत दोन होड्या, फायबर पात आणि मश्चिमती साहित्याचा जाळून खाक झाल्याने रोजीरोटीचा प्रश्न उभा ठाकला आहे. या दुर्घटनेची माहिती मत्स्य व्यवसाय कार्यालयाला तसेच प्रशासनाला देण्यात आली आहे.





