इयत्ता ११वी, १२वीसह बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना संधी
सिंधुदुर्ग, दि. ८ : प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर मोफत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास शासनाने ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. इयत्ता ११वी, १२वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी hmasnew.mahait.org या वेबपोर्टलवर विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी. अर्जाची एक प्रत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह संबंधित शासकीय वसतिगृहात सादर करणे आवश्यक आहे.
शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.
जिल्ह्यातील वसतिगृहांचा समावेश
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि देवगड येथे मुलींची शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. तसेच मालवण, कणकवली आणि वेंगुर्ला येथे मुलांची शासकीय वसतिगृहे सुरू आहेत.
या वसतिगृहांमधील रिक्त जागांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास, इतर मागासवर्गीय तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी ०२३६२-२२८८८२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.






