भाजपच्या ‘सेवा अभियान’ला यश; महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची सकारात्मक भूमिका
मालवण, दि. २८ : प्रतिनिधी
तळागाळातील नागरिकांच्या समस्या थेट शासनाच्या पातळीवर पोहोचवून त्यावर तातडीने मार्ग काढण्याच्या उद्देशाने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरू करण्यात आलेल्या ‘सेवा अभियानाला’ मालवणात यश मिळाले आहे. मालवण शहरात स्वतंत्र महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्याच्या मागणीला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मालवणातील महिलांसाठी लवकरच स्वतंत्र समुपदेशन केंद्र उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सेवा अभियानाचा’ शुभारंभ सावंतवाडी येथे करण्यात आला. यावेळी ‘श्री स्वराज्य सक्षम सेवा प्रतिष्ठान, मालवण’च्या अध्यक्षा शिल्पा यतीन खोत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नावे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मालवणात महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्याबाबतचे निवेदन सादर केले.
मालवण शहर व तालुक्यात बदलती सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती, विभक्त कुटुंब पद्धती तसेच सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे कौटुंबिक वाद आणि हिंसाचाराच्या समस्या वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते. अशा परिस्थितीत समस्याग्रस्त महिलांना समुपदेशन आणि आवश्यक मार्गदर्शनासाठी सध्या कुडाळ किंवा कणकवली येथे जावे लागते. यामुळे महिलांना वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. मालवणातच स्वतंत्र समुपदेशन केंद्र उपलब्ध झाल्यास या महिलांना स्थानिक पातळीवर आवश्यक मदत मिळू शकते, अशी मागणी करण्यात आली होती.
सावंतवाडी येथील ‘सेवा अभियान’ कार्यक्रमात निवेदन प्राप्त होताच उपस्थित अधिकाऱ्यांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मंत्री तटकरे यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत मालवण शहरासाठी स्वतंत्र महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
‘सेवा अभियानाच्या’ माध्यमातून नागरिकांची समस्या थेट शासनाच्या संबंधित विभागापर्यंत पोहोचली आणि त्यावर तातडीने सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, महिला समुपदेशन केंद्राच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याबद्दल शिल्पा खोत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तसेच भारतीय जनता पक्षाचे आभार मानले आहेत. मालवणातील महिलांना त्यांच्या अडचणीच्या काळात स्थानिक पातळीवर समुपदेशन, मार्गदर्शन आणि आवश्यक आधार मिळावा, या उद्देशाने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला मिळालेला हा प्रतिसाद महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.






