महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात सध्या साखरेच्या दरात प्रचंड वाढ झाली असून बाजारात साखरेची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. आगामी सण-उत्सवांच्या काळात साखरेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत तुटवडा असल्याने गेल्या अवघ्या दोन महिन्यांत साखरेच्या किरकोळ (रिटेल) किमतींमध्ये तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून होणारी साठेबाजी रोखण्यासाठी आणि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचावी यासाठी ‘डी-मार्ट’ (D-Mart) सारख्या प्रमुख सुपरमार्केट रिटेलर्ससह ‘बिग बास्केट’ (BigBasket), ‘ब्लिंकिट’ (Blinkit) आणि ‘स्विगी इन्स्टामार्ट’ (Swiggy Instamart) यांसारख्या त्वरित सेवा देणाऱ्या ई-कॉमर्स (Quick Commerce) प्लॅटफॉर्म्सने साखर खरेदीवर रेशनिंग म्हणजे मर्यादा घालण्यास सुरुवात केली आहे.
साखरेच्या तुटवड्याचा फटका केवळ सामान्य ग्राहकांनाच नव्हे, तर पॅकेज्ड फूड व खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांनाही बसत आहे. कंपन्यांना सध्या साखरेसोबतच खाद्यतेलासाठीही अतिरिक्त मोजावे लागत आहेत. सणासुदीच्या काळात खाद्यतेलाची मागणी सर्वाधिक असते. त्यामुळे खाद्यतेल उत्पादक कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती किमान ५ ते ६ टक्क्यांनी वाढवण्याच्या तयारीत आहेत. देशातील एका प्रमुख स्नॅक्स उत्पादक कंपनीच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे किमती ५ टक्क्यांनी वाढवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. साखरेचे दर असेच वाढत राहिल्यास खाद्यतेलाच्या किमती आणखी भडकण्याची दाट शक्यता आहे.
देशांतर्गत बाजारात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात १० लाख टन साखर आयात करण्यास मंजुरी दिली होती. तरीही स्थानिक पातळीवर पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागत आहे. ‘एकॉनॉमिक टाइम्स’च्या (ET) अहवालानुसार, अनेक रिटेल व ई-कॉमर्स कंपन्यांनी एका ग्राहकाला प्रति व्यवहारात केवळ ३ ते ५ किलो साखर खरेदी करण्याची अट घातली आहे. ‘एडब्ल्यूएल ॲग्रीबिजनेस’चे (AWL Agribusiness) कार्यकारी उपध्यक्ष अंगसू मल्लिक यांनी स्पष्ट केले की, दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला साखर उपलब्ध व्हावी आणि साठेबाजीला आळा बसावा यासाठीच कंपन्यांनी पाकिटांच्या संख्येवर ही मर्यादा आणली आहे. (उल्लेखनीय आहे की, ‘विल्मर इंटरनॅशनल’ची AWL आणि ‘श्री रेणुका शुगर्स’मध्ये मोठी भागीदारी असून, त्यांच्याकडे ‘मधुर’ ब्रँडच्या साखरेचे विपणन हक्क आहेत.)
दिल्ली-एनसीआर (Blinkit व Swiggy Instamart): ‘ब्लिंकिट’वर मावाना आणि धामपूर यांसारख्या क्रिस्टल शुगर ब्रँडसाठी प्रति व्यवहार जास्तीत जास्त ५ किलोचा एकच पॅक जोडण्याची परवानगी आहे. तसेच “मर्यादित साठा उपलब्ध असल्याने दिलगीर आहोत” असा स्पष्ट संदेश ॲपवर दिला जात आहे. तर ‘स्विगी इन्स्टामार्ट’वर सुप्रीम हार्वेस्ट आणि मधुर ब्रँडच्या १-१ किलोच्या केवळ दोन पॅकचीच (एकूण २ किलो) खरेदी करता येत आहे.
पुणे (D-Mart, BigBasket व Blinkit): पुण्यात ‘ब्लिंकिट’वरून ग्राहक एका वेळी १-१ किलोचे केवळ तीनच पॅक खरेदी करू शकतात. ‘बिग बास्केट’ने ही मर्यादा प्रति ग्राहक ५ किलोपर्यंत निश्चित केली आहे.







