मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गासाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा निर्णय घेतला.
परीक्षेची गोपनीयता, अखंडता, पारदर्शकता आणि निष्पक्षता कायम राखण्यासोबतच उमेदवारांचा आयोगावरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या पदांसाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
फेरपरीक्षेची तारीख आणि अन्य तपशील स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.







