कोळंब गावातील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली असून वाहनचालकांचे अपघात वाढले आहेत. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी आज मालवण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला जाब विचारला.
ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे ठेकेदाराने उद्या १० डिसेंबरपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र काम वेळेवर न सुरू झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
सागरी महामार्गावरील कोळंब पुल ते सर्जेकोट वळणापर्यंतचा रस्ता मोठ्या खड्ड्यांनी भरून गेला आहे. खड्ड्यातून वाहन चालवताना चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून अनेक लहान-मोठे अपघातही घडले आहेत. कोळंब पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा मागणी केली, तसेच वर्क ऑर्डर देण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांची नाराजी टोकाला पोहोचली.
आज ग्रामस्थांनी उपविभागीय कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहून खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली दुर्दशा आणि विभागाची निष्क्रियता यावर अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. “साहित्य येऊन पडले आहे, पण काम का सुरू होत नाही?” असा थेट सवाल त्यांनी अधिकार्यांना केला. त्यानंतर ठेकेदाराशी फोनद्वारे संपर्क साधण्यात आला असता त्याने उद्या सकाळी १० वाजता काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, “आम्हीही उद्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत. काम सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील.”
यावेळी कोळंब सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, माजी सरपंच प्रतिमा भोजने, सर्जेकोट–मिर्याबांदा सरपंच नीलिमा परुळेकर, प्रमोद कांडरकर, प्रसाद भोजने, सुरेश लाड, बापू बावकर, विजय भोजने, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.







