ओझर विद्यामंदिर प्रशालेमध्ये प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबईचे अनुभवी ट्रेनर संजय मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रात्यक्षिकांसह सर्वांगीण मार्गदर्शन केले.
शिबिरात प्रथमोपचार करणाऱ्या व्यक्तीकडे असावयाचे गुण, प्रथमोपचाराचे उद्देश, बँडेजचे प्रकार आणि बांधण्याच्या पद्धती, जखमेतून रक्तस्त्राव थांबवण्याचे उपाय, विविध प्रकारचे फ्रॅक्चर आणि त्यासाठी करावयाचे प्रथमोपचार, त्वचा भाजल्यास घ्यावयाची काळजी, चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे यावरील उपाययोजना, हृदयविकाराचा झटका आल्यावर त्वरित करावयाचे उपचार तसेच सीपीआर (CPR) देण्याची योग्य पद्धत यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.
साप, प्राणी किंवा कीटकांच्या दंशानंतर होणारी विषबाधा, विषप्रयोग झाल्यास तातडीचे उपाय, तसेच कोणत्याही साधनाविना जखमींना वाहून नेण्याच्या पद्धती यांचेही संजय मेस्त्री यांनी पीपीटी, व्हिडिओ आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण केले. या प्रात्यक्षिकांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने प्रशिक्षण अधिक उपयुक्त ठरले.
या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराबाबत सखोल ज्ञान प्राप्त झाले असून प्रशालेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी हे प्रशिक्षण अत्यंत लाभदायक ठरले. विना मोबदला दिलेल्या या मार्गदर्शनाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी संजय मेस्त्री यांचे विशेष आभार मानले.
शिबिरासाठी प्रशालेचे विद्यार्थी, तसेच शिक्षक ए. ए. शेर्लेकर, पी. के. राणे, एस. जे. सावंत, पी. आर. पारकर, एस. पी. पवार, विजय नातू आणि शिक्षकेतर कर्मचारी आर. जे. जाधव, पी. व्ही. खोडके, एम. डी. परूळेकर उपस्थित होते.







