समुद्रातील वाढते प्रदूषण थांबवणे, समुद्री जीवसृष्टीचे रक्षण करणे आणि किनारपट्टी प्रदूषणमुक्त ठेवणे या उद्देशाने ‘समुद्र कचरा स्वच्छता उपक्रम : टप्पा – २’ हा विशेष उपक्रम मंगळवार, दि. ९ डिसेंबर रोजी मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘महासागरांसाठी एकत्र येऊया’ या संदेशासह सकाळी ८ ते ९ या वेळेत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
या मोहिमेत वनशक्ती, स्वच्छ भारत, सागर शक्ती – ओशन्स पीपल, महाराष्ट्र मत्स्य विभाग, किल्ला संरक्षण गट, युथ बीट्स फॉर क्लायमेट, निलक्रांती आणि वन विभाग या विविध संस्था आणि विभाग संयुक्तपणे सहभागी होत आहेत.
समुद्रतळ स्वच्छतेसाठी प्रशिक्षित डायव्हर्स समुद्रात
या अभियानात प्रशिक्षित डायव्हर्स प्रत्यक्ष समुद्रात उतरून समुद्रतळावर साचलेला कचरा गोळा करणार आहेत. यात प्लास्टिक, बाटल्या, मासेमारीची जाळी, धातूचे अवशेष आणि सागरी जीवसृष्टीस हानी पोहोचवणारा इतर कचरा मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्याचे नियोजन केले आहे.
किनारपट्टी स्वच्छतेत स्वयंसेवकांचा सहभाग
समुद्रतळ स्वच्छतेसोबतच जमिनीवरील किनारपट्टी स्वच्छता मोहिम स्वयंसेवकांच्या माध्यमातून पार पडणार आहे. मालवण किनाऱ्यावर दररोज वाढत जाणारा प्लास्टिक कचरा, पाण्यातील तरंगते अवशेष आणि पर्यटकांकडून निर्माण होणारा घातक कचरा यामधून मुक्तता करण्याची ही संयुक्त मोहीम असेल.
नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
सागरी जैवविविधतेचे संवर्धन, समुद्री कासवांसह सागरी जीवांचे रक्षण आणि पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ किनारे निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी, मासेमार आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.
मालवणसारख्या सागरी पर्यटन केंद्रात महासागर संवर्धनाची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.







