अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, मालवण शाखेतर्फे दिला जाणारा मानाचा शिक्षणतज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार २०२६ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, ओवळीये क्र. १ येथील पदवीधर शिक्षिका रसिका राजेंद्र तेंडोलकर यांना जाहीर झाला आहे.
पाच हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून, १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता केंद्रशाळा आचरे क्र. १ येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुरेश रामचंद्र गावकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.
३३ वर्षांच्या दीर्घ सेवाकाळात रसिका तेंडोलकर यांनी बालक, पालक, शिक्षक आणि समाज यांना जोडणारे अनेक उपक्रम राबविले. “शाळा समाजात आणि समाज शाळेत” ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणत त्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
अध्यापनासोबतच त्या आदर्श ललितलेखक व कवयित्री म्हणूनही जिल्ह्यात परिचित आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी अभिनंदन करून गौरव व्यक्त केला आहे.
या पुरस्कार सोहळ्यात संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे.







