पणजी, दि. ७ : देशात समानता, सर्वधर्मीयांना समान हक्क आणि स्त्री-पुरुष समानतेचा विचार मजबूत करण्याची गरज असून, संविधानाला विरोध करणारा फॅसिस्ट विचार देशासाठी तसेच जगासाठी घातक आहे. देशाला अशा विचारांपासून वाचविण्यासाठी संविधानाचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
पणजी येथे ऑल इंडिया कौमी तंजीमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान बचाव’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, गोव्याचे माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिनो, माजी केंद्रीय मंत्री इदुराद्रो फालेरो, माजी खासदार रमाकांत खलप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुनाफ हकीम, अजिंक्य देसाई तसेच कौमी तंजीमचे महाराष्ट्र सरचिटणीस डॉ. हाझी झाकीर शेख आदी उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले की, देशात दोन विचारप्रवाह आहेत. एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क व अधिकार देणारा आणि स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारा आहे. हा विचार संविधानाचा असून काँग्रेस पक्षाची त्याच विचारधारेनुसार वाटचाल आहे. दुसरीकडे मनुस्मृतीला मानणारा आणि राजसत्ता व धर्मसत्ता मुठभर लोकांच्या हाती असावी, असा विचार भाजपा व आरएसएसचा असल्याचा आरोप त्यांनी केला.
स्वातंत्र्यानंतर देशाने लोकशाही आणि संविधानाच्या मार्गाने वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आणि मागील ७५ वर्षे देशाची वाटचाल याच मार्गाने सुरू आहे. मात्र, संविधानाला अभिप्रेत असलेला देश भाजपा आणि आरएसएसला नको असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. स्त्री-पुरुष समानता आणि अस्पृश्यतेविरोधी विचार संविधानाने स्वीकारला असून, त्याच्या विरोधातील विचार देशाला तारणारा नाही, असेही ते म्हणाले.
आरएसएसच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा उल्लेख करत सपकाळ यांनी नागपुरातील रॅलीदरम्यान संघाच्या नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्याचा संदर्भ दिला. हा संघाचा वैचारिक पराभव असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आरएसएसने अद्याप नोंदणी केलेली नसल्याचा दावा करत सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची नोंदणी करून संविधान स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘संविधान आणि काँग्रेसचा विचार एकाच नाण्याच्या दोन बाजू’
गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे म्हणाले की, संविधान आणि काँग्रेसचा विचार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संविधानाने देशातील सर्व जाती-धर्मांना समान अधिकार दिले आहेत. या संविधानाचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस सातत्याने लढत आली असून, पुढेही हा लढा सुरू राहील. भाजपा संविधान संपविण्याचे काम करत असल्याचा आरोप करत त्याविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे संविधानाच्या रक्षणासाठी लढत असून, कोणत्याही परिस्थितीत संविधान बदलू दिले जाणार नाही, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही ठाकरे यांनी सांगितले.
‘संविधानाला आरएसएसचा सुरुवातीपासून विरोध’
गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही भाजपा आणि आरएसएसवर टीका केली. राहुल गांधी संविधानाची प्रत हातात घेऊन देशभर संविधान बचाव अभियान राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
संविधान बदलण्याची भाषा २०१४ पासून सुरू झालेली नसून, संविधानाची निर्मिती झाल्यापासूनच आरएसएसने त्याला विरोध केल्याचा आरोप चोडणकर यांनी केला. पूर्वीचा जनसंघ आणि आताचा भाजपा हे संविधानविरोधी राजकीय विचारांचे पक्ष असल्याचे ते म्हणाले. या विचारसरणीच्या लोकांनी अनेकदा संविधान जाळल्याचा आरोप करत, सध्या संविधानाची पायमल्ली करून कारभार केला जात असल्याची टीका त्यांनी केली.
भारताच्या राष्ट्रध्वज तिरंग्यालाही या विचारसरणीने विरोध केल्याचा दावा चोडणकर यांनी केला. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे आरएसएसच्या कार्यालयावर तिरंगा फडकवला गेला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.







