‘क्लायमेट संवाद’ कार्यक्रमात स्थानिक ज्ञानाचा धोरणनिर्मितीत वापर करण्याची मागणी
मालवण : हवामान बदलाचा परिणाम केवळ पर्यावरणावर होत नसून, त्याचा थेट परिणाम किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या उपजीविकेवर आणि आरोग्यावरही होत आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मच्छीमारांचे पारंपरिक ज्ञान आणि अनुभव धोरणनिर्मितीत विचारात घेतले पाहिजेत, अशी महत्त्वपूर्ण भूमिका मालवणच्या पर्यावरण संवर्धन कार्यकर्त्या आणि ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेच्या अध्यक्षा मेगल डिसोजा यांनी मांडली.
मुंबई येथील यूथ फॉर युनिटी अँड वॉलंटरी ॲक्शन (युवा) या संस्थेच्या वतीने आणि भोपाळ येथील ‘मिट्टी का घर–मुस्कान’ या स्थानिक संस्थेच्या सहकार्याने हवामान बदल, युवकांचे प्रश्न आणि जागतिक हवामानशास्त्र या विषयावर ‘क्लायमेट संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मेगल डिसोजा यांनी सहभाग घेत किनारपट्टी भागातील हवामान बदलाचे परिणाम आणि मच्छीमारांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांबाबत आपले विचार मांडले.
मच्छीमारांकडे हवामानाचा अंदाज सांगणारे पारंपरिक ज्ञान
भारताला मोठी आणि समृद्ध किनारपट्टी लाभली आहे. किनारपट्टीवरील मच्छीमारांचे जीवन समुद्राशी जोडलेले असून मासेमारी हे त्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. समुद्रावरून किनाऱ्याकडे येणारे वारे, त्यातील ऋतुनुसार होणारे बदल, किनाऱ्यावर येणारे शेवाळ, समुद्राच्या पाण्याच्या रंगातील बदल अशा अनेक नैसर्गिक संकेतांवरून स्थानिक मच्छीमार हवामानाचा अंदाज बांधत असतात.
या पारंपरिक आणि अनुभवाधारित ज्ञानाचा उपयोग हवामान बदलासंदर्भातील धोरणे आखताना केला पाहिजे, अशी भूमिका मेगल डिसोजा यांनी मांडली.
मच्छीमारांचे सण, परंपरा आणि मासेमारीशी संबंधित अनेक प्रथा या स्थानिक हवामान आणि समुद्राच्या स्थितीशी निगडित असल्याचेही त्यांनी सांगितले. हवामानातील बदलाचा परिणाम त्यांच्या उत्पन्नावर आणि उपजीविकेवर होतोच; मात्र त्याचबरोबर मानवी आरोग्यावरही त्याचे गंभीर परिणाम होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘विकासाची व्याख्या बदलण्याची गरज’
विकासाची संकल्पना केवळ उच्च राहणीमान आणि वाढत्या आर्थिक क्षमतेच्या निकषावर मोजली जाऊ नये. निसर्गाशी बांधिलकी ठेवून आणि निसर्गाला पूरक पद्धतीने माणसाचे जीवन घडणे, यालाच विकास मानले पाहिजे, असे मत मेगल डिसोजा यांनी व्यक्त केले.
‘ग्लोबल साऊथ’चा दृष्टिकोन महत्त्वाचा
जागतिक हवामान बदलाच्या चर्चेत ग्लोबल साऊथमधील देशांचा आणि तेथील नागरिकांचा दृष्टिकोन अधिक गांभीर्याने विचारात घेण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
विकसित देशांकडे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. विकसित देशांनी विकसनशील देशांमधील खनिज संपत्ती, स्थानिक ज्ञान आणि मानवी श्रमांचा दीर्घकाळ वापर करून स्वतःचे तंत्रज्ञान विकसित केले. त्यामुळे विकसित देशांनी हे तंत्रज्ञान विकसनशील देशांना उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी भूमिका चर्चेत मांडण्यात आली.
हवामान बदलाचा धोका भविष्यात निर्माण होईल, अशी चिंता विकसित देशांमध्ये व्यक्त केली जाते; मात्र विकसनशील देशांमधील नागरिक आजच हवामान बदलाचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवत आहेत, याकडेही या संवादातून लक्ष वेधण्यात आले.
तज्ज्ञांची उपस्थिती
या ‘क्लायमेट संवाद’ कार्यक्रमाला शेरीन एल. वॉटर (WGII, TSU, IPCC), डॉ. बार्ट व्हॅन डेन हर्क (IPCC WG II Co-chair) आणि ग्रेसेस चिंग (CLARE Project Coordinator) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
‘युवा’ संस्थेच्या दुलरी यांनी हवामान बदलाचा सामान्य माणूस आणि श्रम करणाऱ्या कामगारांवर होणारा परिणाम समजून घेऊन, त्यांच्या अनुभवांच्या आधारे उपाययोजना आणि धोरणनिर्मिती केली पाहिजे, अशी भूमिका मांडली.
कार्यक्रमाला वसई येथील हेरीन वोरा व दानिया डाबरे, अंबुजवाडीचे शहेनशहा अन्सारी, अमित भालेराव (SCAC, महाराष्ट्र सरकार), अकोल्याच्या रसिका वानखडे, रोशनी नुग्गेहल्ली, नितीन मेश्राम, दुलरी परमार (युवा), ऐश्वर्या आयुष्मान, निविया जैन (HLRN), आरव व टीना (मुस्कान संस्था), NIASच्या रिसर्चर अंकिता रंजन, पीयूष प्रिया, संदीप महतो आदी उपस्थित होते.
मालवणच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या अनुभवातून हवामान बदलाचा व्यापक प्रश्न राष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची संधी मेगल डिसोजा यांच्या सहभागामुळे मिळाली असून, स्थानिक ज्ञान आणि पर्यावरण संवर्धन यांच्यातील नात्याला या संवादातून अधोरेखित करण्यात आले.






