मालवण, दि. १५ (प्रतिनिधी) : ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी तयार केलेले एआय व्हिडीओ दिशाभूल करणारे असून, त्यातून तत्कालीन आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळातील अपयशच समोर येत आहे, असा आरोप मालवण नगरपालिकेच्या आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी केला. शहरातील आरोग्य व विविध समस्यांवरून मयेकर यांनी १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत मयेकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.यावेळी नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर उपस्थित होते.
आरोग्य सभापती पूनम चव्हाण म्हणाल्या, “तपस्वी मयेकर यांच्या मातोश्री नगरसेविका असताना त्यांनी आपल्या तत्कालीन आमदारांना शहरातील समस्यांबाबत प्रश्न का विचारले नाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शहरातील सध्याच्या समस्यांसाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळाचाही विचार केला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
कचऱ्याचे ढीग कमी झाले
“पाच वर्षांपूर्वी मालवण शहरात कचऱ्याचे ढीग कशा पद्धतीने असायचे आणि आज परिस्थिती किती बदलली आहे, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. मालवणची जनताच त्याबाबत सांगेल,” असे पूनम चव्हाण म्हणाल्या.
कचरा व्यवस्थापन ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आपल्या प्रभागात कचरा होऊ नये यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी नगरसेवकांनीही पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कचरा बिलाबाबतचा आरोप फेटाळला
तपस्वी मयेकर यांनी कचरा व्यवस्थापनाची बिले खोटी असल्याचा आरोप केला आहे. यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ मधील तरतुदींनुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याचे सांगितले.
घरोघरी कचरा संकलनाबाबत नगरपालिका क्षेत्रातील निर्धारित संकलन बिंदूंवर नागरिकांनी कचरा आणून देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिका क्षेत्रातील हजारो घरांमधून प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावून कचरा उचलणे, असा घरोघरी कचरा संकलनाचा अर्थ नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वाहनांच्या स्कॅनिंगवर भर
आपण आरोग्य सभापती झाल्यापासून नगरपालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनांचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. सध्या ९७.४७ टक्के स्कॅनिंग होत असल्याचा दावा पूनम चव्हाण यांनी केला.
नगरपालिकेची कचरा संकलनाची गाडी आल्यानंतर नागरिकांनी त्यात कचरा टाकण्यासाठी सहकार्य केले, तर शहरातील कचऱ्याचे ढीग कमी होण्यास मोठी मदत होईल. विरोधी लोकप्रतिनिधींनीही सहकार्याची भूमिका घेत नागरिकांना याबाबत आवाहन करावे, असे त्या म्हणाल्या.
‘शहराची बदनामी थांबवा’
“विरोधकांना केवळ स्टंटबाजी करायची आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी मालवण शहराची बदनामी थांबवावी,” असा पलटवार पूनम चव्हाण यांनी केला.
शहरातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचे सामूहिक सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप न करता प्रत्यक्ष उपाययोजनांना प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.






