नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दरवर्षी भेडसावणारा रेल्वे तिकिटांचा तुटवडा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे कोकण रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोकणी प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे. शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता बेलापूर येथील कोकण रेल्वे मुख्यालयावर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमित रेल्वेगाड्यांसोबत तब्बल २७२ गणपती स्पेशल गाड्या जाहीर करण्यात आल्या असल्या, तरी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अपेक्षित प्रमाणात तिकिटे उपलब्ध होत नसल्याचा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे. रेल्वे प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
विशेषतः तळ कोकणाकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा मुद्दा प्रवासी संघटनेने उपस्थित केला आहे. जाहीर करण्यात आलेल्या अनेक गणपती स्पेशल गाड्या केवळ रत्नागिरीपर्यंत मर्यादित असल्याने सिंधुदुर्ग आणि तळ कोकणातील प्रवाशांनी पुढे कसे जावे, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.
कोकण रेल्वे प्रकल्पात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात योगदान दिले असूनही महाराष्ट्राच्या वाट्याला मोजक्याच गाड्या येत असल्याचा आरोप करत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना त्याप्रमाणात रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दहा वर्षांपासून मागण्या प्रलंबित
कोकणी प्रवासी संघटनेच्या म्हणण्यानुसार, गेल्या दहा वर्षांपासून विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अद्याप या मागण्यांवर ठोस कार्यवाही झालेली नाही.
प्रमुख मागण्यांमध्ये सावंतवाडी टर्मिनस पूर्ण क्षमतेने सुरू करणे, वसई-सावंतवाडी आणि कल्याण-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करणे, मुंबई-रत्नागिरी इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करणे, दादर-चिपळूण मेमू सेवा सुरू करणे आणि महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण तातडीने करणे यांचा समावेश आहे.
याशिवाय कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर छप्पर, फूट ओव्हरब्रिज तसेच प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
कोकणवासीयांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर लाक्षणिक उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे प्रवासी संघटनेने म्हटले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांसह सर्व चाकरमान्यांनी आपल्या हक्कासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
उपोषणाचे ठिकाण : कोकण रेल्वे मुख्यालय, बेलापूर
दिनांक : शनिवार, १५ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी ८ वाजता
प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेखर बागवे आणि सचिव यशवंत जडयार यांनी चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.







