स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि ‘हर घर तिरंगा’चा संदेश देत जनजागृती रॅली
मालवण (प्रतिनिधी) :
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने स्वच्छता पंधरवडा, नशामुक्त युवा अभियान आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात ध्वजारोहण, जनजागृती रॅली आणि दत्तक गाव कोळंब येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत महाविद्यालयात सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर NSS स्वयंसेवकांनी महाविद्यालय–धुरीवाडा ते कोळंब पूल या मार्गावर जनजागृती रॅली काढली. स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जबाबदारी याबाबत घोषणाबाजी करत स्वयंसेवकांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली.
सन २०२६-२७ साठी NSSचे दत्तक गाव म्हणून निवडलेल्या कोळंब येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वयंसेवकांनी श्रमदान करून परिसराची स्वच्छता केली. यावेळी दत्तक गाव म्हणून NSS विभागाला सहकार्य केल्याबद्दल सरपंच सिया धुरी यांचा कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
उपसरपंच विजय नेमळेकर, ग्रामपंचायत अधिकारी युती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विशाल फणसेकर, संपदा प्रभू, संजना शेलटकर व नंदा बावकर यांनी अभियानाला सहकार्य केले. मंडळ अधिकारी मीनल चव्हाण, तलाठी शिवलकर, कोतवाल पाताडे, आरोग्य विभागाचे डॉ. पवार, ग्रामपंचायत कर्मचारी भूपेश ढोलम, जान्हवी कांदळगावकर, प्राची पेडणेकर तसेच ग्रामस्थ प्रसाद भोजने यांनीही स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
स्वच्छता अभियानाबद्दल सरपंच सिया धुरी यांनी NSS विभागाचे आभार मानले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानातील ‘सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रमात सहभाग घेतला.
या सर्व उपक्रमांमध्ये NSSच्या ३७ स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. उपक्रमांचे नियोजन डॉ. सुमेधा नाईक, डॉ. संकेत बेळेकर, प्रा. योगिता सावंत, प्रा. अनघा टिकले, श्री. गौतम मानवर, कु. रिद्धी काजरेकर आणि कु. अपूर्वा पालव यांनी केले.






