मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही तांत्रिक अडचणी आड येणार नाहीत. पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळपीक विमा नुकसानभरपाईच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत सन २०२५-२६ मधील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीला महाराष्ट्राचे कृषी आयुक्त सुरज मांढरे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा कृषी अधिकारी, सीएससीचे व्यवस्थापक वैभव देशपांडे, भारतीय कृषी विमा कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुंभारे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नितेश राणे म्हणाले की, हवामानातील बदल आणि तापमानवाढीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, काही प्रकरणांमध्ये तांत्रिक नोंदी आणि कागदपत्रांतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाईचा लाभ मिळालेला नाही. या सर्व त्रुटी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही प्राधान्याने करावी, असे त्यांनी सांगितले.
काही विमा प्रस्ताव कागदपत्रांतील त्रुटींमुळे रद्द झाल्याचे बैठकीत निदर्शनास आले. अशा प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव पुन्हा कार्यान्वित करण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. हवामान केंद्रांशी संबंधित तांत्रिक बाबी, महसूल मंडळांच्या नोंदी तसेच विमा दाव्यांमधील अडचणी सोडविण्यासाठी कृषी, महसूल, विमा कंपनी आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गातील आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीबाबत काही महसूल मंडळांना तांत्रिक नोंदीअभावी विमा लाभ मिळालेला नसल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींचीही प्राधान्याने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, आजगाव महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्रातील तांत्रिक त्रुटींमुळे अत्यल्प नुकसानभरपाई मिळाल्याच्या प्रकरणावरही बैठकीत चर्चा झाली. या प्रकरणात योग्य ती उपाययोजना करण्याच्या सूचना राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तांत्रिक अडचणींमुळे पात्र शेतकरी त्यांच्या हक्काच्या विमा नुकसानभरपाईपासून वंचित राहू नयेत, यासाठी शासन कटिबद्ध आहे. नुकसानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, अशा परिस्थितीत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करावी, असे नितेश राणे यांनी पुन्हा स्पष्ट केले.







