मालवण (प्रतिनिधी) :
मालवणातील एका वित्तीय संस्थेच्या सोनेतारण योजनेत आर्थिक फसवणूक व गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ग्राहकांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. आपल्या मागण्यांचे अर्ज स्वीकारून त्याची पोच द्यावी, या मागणीसाठी ग्राहकांनी संबंधित वित्तीय संस्थेच्या कार्यालयात ठिय्या मांडला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर संस्थेच्या व्यवस्थापनाने ग्राहकांचे अर्ज स्वीकारले.
मालवणातील संबंधित वित्तीय संस्थेकडून सोनेतारण व्यवहारात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ग्राहकांनी आपले सोने परत मिळविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून एकत्रितपणे लढा सुरू केला आहे. या प्रकरणात सर्व ग्राहकांचे जबाब नोंदवून त्यांची एकत्रित तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्याच्या तयारीतही ग्राहक आहेत.
सोमवारी सकाळपासून मोठ्या संख्येने ग्राहक संबंधित संस्थेच्या कार्यालयात दाखल झाले. प्रत्येक ग्राहकाच्या सोनेतारण व्यवहाराची सखोल माहिती मिळावी, तारण ठेवलेले सोने सध्या नेमके कुठे आहे, त्याची सद्यस्थिती काय आहे, यासह विविध मागण्या ग्राहकांनी आपल्या अर्जातून केल्या.
मात्र, संस्थेच्या व्यवस्थापनाने सुरुवातीला अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याने ग्राहक संतप्त झाले. यावेळी ग्राहक आणि संस्था व्यवस्थापन यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अर्ज स्वीकारल्याशिवाय कार्यालयातून उठणार नसल्याची भूमिका घेत ग्राहकांनी संस्थेच्या कार्यालयातच ठिय्या मांडला.
ग्राहकांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहत अर्ज स्वीकारून त्याची अधिकृत पोच देण्याची मागणी लावून धरली. परिस्थिती लक्षात घेता संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेने व्यवस्थापनाने ग्राहकांचे अर्ज स्वीकारले आणि त्यांची पोच देण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून आपले तारण ठेवलेले सोने सुरक्षितपणे परत मिळावे, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. सर्व संबंधित ग्राहकांचे जबाब आणि कागदपत्रे एकत्रित करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी ग्राहकांनी सुरू केली असून, त्यामुळे या प्रकरणाला आगामी काळात कायदेशीर वळण लागण्याची शक्यता आहे.






