मालवण (प्रतिनिधी)
मालवण आगारातून नियमितपणे सुरू असलेली मालवण–धामापूर मार्गे कुडाळ रेल्वेस्टेशन ही सकाळची बसफेरी काही दिवसांपासून बंद करण्यात आल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या मार्गावर बसला चांगले भारमान मिळत असतानाही सेवा बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मालवण आगारातून दररोज सकाळी १०.३० वाजता कुडाळ रेल्वेस्टेशनच्या दिशेने ही बसफेरी सुरू होती. धामापूरसह मार्गावरील विविध गावांतील प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत सोयीची होती. विशेषतः कुडाळ रेल्वेस्टेशन गाठण्यासाठी अनेक प्रवासी या बससेवेवर अवलंबून होते. मात्र, फेरी बंद झाल्याने त्यांना खासगी वाहने किंवा इतर पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.
कुडाळहून मालवणच्या दिशेने दुपारी १२ वाजता या बसची परतीची फेरी होती. त्यामुळे सकाळी कुडाळला जाणाऱ्या आणि दुपारी मालवणकडे परतणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होत होता. रेल्वेने पुढील प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही मालवण–कुडाळ रेल्वेस्टेशन जोडणारी ही बसफेरी महत्त्वाची ठरत होती.
बससेवा बंद झाल्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांना बसत आहे. महाविद्यालयीन कामकाज, शैक्षणिक कामे तसेच इतर कारणांसाठी कुडाळला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासाचे नियोजन करणे अवघड झाले आहे. खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने अतिरिक्त आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
या मार्गावर नियमित प्रवाशांची संख्या मोठी असून बसफेरीला चांगले भारमान आणि उत्पन्न मिळत असल्याचा दावा प्रवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे फेरी बंद करण्यामागील नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागातील प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार आणि रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली ही सेवा तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे. मालवण आगाराने सकाळी १०.३० वाजताची मालवण–धामापूर–कुडाळ रेल्वेस्टेशन फेरी तसेच दुपारी १२ वाजताची कुडाळ–मालवण परतीची फेरी पूर्ववत करून नियमित सुरू ठेवावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांनी केली आहे.






