वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी येथील समाजमंदिरात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिवादनानंतर बोलताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई म्हणाले, “महानिर्वाण दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नसून जागृतीचा दिवस आहे. ज्यांनी वंचित, शोषित, गोर-गरीबांना माणूस म्हणून जगण्याची ओळख दिली, अधिकार दिले, स्वाभिमान दिला, समता-बंधुता आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची शक्ती दिली, त्या महामानवाला शतशः वंदन!”
यावेळी त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत, “प्रगतीशील, लोकशाहीवादी आणि सर्वसमावेशक भारताचे स्वप्न साकार करणाऱ्या बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र श्रद्धांजली,” असे सांगितले.
कार्यक्रमाला मंडल अध्यक्ष पप्पू परब, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, जि.का.का. सदस्य सुहास गवंडळकर, मच्छिमार सेलचे वसंत तांडेल, सचिन शेटये, युवराज जाधव, योगेश नाईक, सौ. यशस्वी नाईक यांसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
दलित सेवा मंडळाचे कार्यकर्ते सुहास जाधव, प्रेमानंद जाधव, विठ्ठल जाधव, गणपत जाधव, दामोदर जाधव, सुभाष जाधव यांनीही आदरांजली अर्पण केली. तसेच भारतीय बौद्ध महासभा, तालुका वेंगुर्ला अध्यक्ष लाडू जाधव, सभासद पल्लवी मठकर, मैथिली जाधव आदींचीही प्रमुख उपस्थिती होती.







