नांदोस येथील शिवकालीन गढीवरील पुरातत्त्वीय उत्खनन कार्याचा शुभारंभ आज भव्य सोहळ्यात झाला. मालवणच्या समृद्ध वारशाच्या नकाशावर नवी, अभिमानाची नोंद करणारा हा क्षण गावकऱ्यांसह सर्व शिवप्रेमींसाठी भावनिक ठरला.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ मा. सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. आशिष शेलार आणि कुडाळ–मालवणचे आमदार माननीय निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी गावकरी, शिवप्रेमी आणि मान्यवरांची मोठी गर्दी झाली होती.
शिवकालीन इतिहासातील दडलेले खजिने उलगडण्यास सुरुवात
गड-किल्ल्यांचे वैभव, मालवणच्या मातीचा अभिमान आणि शिवकालीन वारशाची साक्ष देणारे अनेक पुरातत्त्वीय पुरावे या उत्खननातून प्रकाशात येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, श्री. अतुल काळसेकर, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती श्री. संतोष साठविलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नांदोस ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी उत्साहात सहभाग नोंदवत हा ऐतिहासिक क्षण साक्षीभावाने अनुभवला.
या उपक्रमामुळे नांदोस आणि मालवण परिसरातील शिवकालीन इतिहास नव्या संशोधनासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







