बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा एकदा दमदार आणि वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘महाकाली’ या बहुप्रतीक्षित पौराणिक चित्रपटाचा पहिला विस्तारित टीझर २४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून, त्यातील अक्षय खन्नाचा ‘असुरगुरू शुक्राचार्य’ हा लूक आणि दमदार व्यक्तिमत्त्व सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. हा चित्रपट प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सचा भाग असून, ‘शुक्राचार्याज वॉर क्राय’ या नावाने टीझर सादर करण्यात आला आहे.
टीझरमध्ये अक्षय खन्ना शुक्राचार्यांच्या भूमिकेत अत्यंत प्रभावी आणि रौद्र रूपात दिसतो. असुरांचे गुरु असलेल्या शुक्राचार्यांच्या भूमिकेत त्याचा आवाज, देहबोली आणि पडद्यावरील उपस्थिती लक्ष वेधून घेते. धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्षाची पार्श्वभूमी टीझरमध्ये पाहायला मिळते. जवळपास दोन मिनिटे ५३ सेकंदांच्या या टीझरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली आहे.
अक्षय खन्नाच्या या भूमिकेची तुलना त्याच्या अलीकडच्या दमदार व्यक्तिरेखांशी सोशल मीडियावर केली जात आहे. ‘धुरंधर’ आणि ‘छावा’नंतर पुन्हा एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणाऱ्या अक्षयच्या अभिनयाचे आणि त्याच्या ‘शुक्राचार्य’ लूकचे चाहते कौतुक करत आहेत.
मात्र टीझरच्या शेवटच्या भागाने आणखी एक मोठे सरप्राइज दिले आहे. अभिनेत्री श्रीया रेड्डी हिची महाकालीच्या रूपातील झलक काही क्षणांसाठी दिसते आणि याच दृश्याने सोशल मीडियावर विशेष लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या उग्र आणि प्रभावी रूपाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, अक्षय खन्नाच्या शुक्राचार्यांसमोर महाकालीच्या रूपातील तिची भूमिका नेमकी कशी उलगडणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
श्रीया रेड्डीने यापूर्वी ‘सलार’मधील दमदार भूमिकेतून आपली वेगळी छाप पाडली होती. ‘महाकाली’मध्ये तिला अधिक शक्तिशाली आणि पौराणिक व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळणार आहे. या भूमिकेतील अॅक्शन सीक्वेन्ससाठी तिने कलरीपयट्टूचे दीर्घ प्रशिक्षण घेतल्याचेही वृत्त आहे.
‘हनुमान’नंतर प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सचा विस्तार ‘महाकाली’च्या माध्यमातून होत आहे. पौराणिक कथा, अॅक्शन आणि आधुनिक सिनेमॅटिक मांडणी यांचा संगम साधणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरने प्रदर्शनापूर्वीच वातावरण निर्मिती केली आहे. चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त आहे.
शुक्राचार्याच्या भूमिकेतील अक्षय खन्नाचा रौद्र अवतार आणि महाकालीच्या रूपातील श्रीया रेड्डीची झलक—या दोन गोष्टींमुळे ‘महाकाली’चा टीझर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.





