मालवण : प्रतिनिधी
लोककला ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून ती माणुसकीची शिकवण देणारी संस्कृती आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा मालवणात आली. रक्ताची नाती नसली तरी कलेने जोडलेल्या नात्याचे जिवंत उदाहरण ठरत, ‘संयुक्त दशावतार २००० मानधन ग्रुप’ने अपघातग्रस्त दशावतार कलाकार भास्कर उर्फ पप्पू मेस्त्री आणि त्यांचे वडील, ज्येष्ठ मृदंगवादक सत्यवान उर्फ नाना भास्कर मेस्त्री यांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन माणुसकीचा आदर्श घालून दिला.
मालवण तालुक्यातील राठीवडे येथील दशावतार स्त्री-कलाकार भास्कर (पप्पू) मेस्त्री आणि त्यांचे पिताश्री सत्यवान (नाना) मेस्त्री यांचा ३० जून २०२६ रोजी प्रवासादरम्यान झालेल्या अपघातात गंभीर दुखापत झाली. घरातील कर्ते पुरुष संकटात सापडल्याची माहिती मिळताच, संयुक्त दशावतार २००० मानधन ग्रुपचे कलाकार तातडीने त्यांच्या मदतीसाठी धावून आले.
सन २०२५ मध्येही एका अपघातग्रस्त दशावतार कलाकाराला मदतीचा हात देणाऱ्या या ग्रुपने यंदाही आपल्या समाजबांधिलकीची परंपरा कायम ठेवली. सन २०२६ मधील संयुक्त नाट्यप्रयोगांदरम्यान संगीतसाथींसह सर्व कलाकारांना मिळालेल्या बक्षीस रकमेतून १० हजार रुपयांची मदत जमा करून ती थेट रुग्णालयात जाऊन मेस्त्री पिता-पुत्रांच्या हाती सुपूर्द करण्यात आली.
यावेळी ग्रुपच्या सदस्यांनी “देवाने दिलेले इतरांना वाटून द्यावे; देव बनता आले नाही तरी देवमाणूस म्हणून जगावे,” हा संदेश कृतीतून दिला. या मदतीसाठी संयुक्त नाट्यप्रयोगांमध्ये प्रेमाने बक्षीस देणाऱ्या रसिक, हितचिंतक आणि दात्यांचे ग्रुपने मनःपूर्वक आभार मानले. रसिकांनी दिलेली रक्कम एका गरजू कलाकाराच्या मदतीसाठी उपयोगी पडल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी संयुक्त दशावतार २००० मानधन ग्रुपने एक महत्त्वाचा संदेश दिला. दशावतार कलाकारांमध्ये कोणतीही गटबाजी नसून, कलाकारांचे संवर्धन, संघटन, परंपरेचे जतन आणि शासनदरबारी हक्कांसाठी सर्व कलाकार एका झेंड्याखाली एकदिलाने उभे राहतील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
“एका कलाकाराचे दुःख म्हणजे संपूर्ण दशावतार परिवाराचे दुःख आणि एका कलाकाराचा आनंद म्हणजे संपूर्ण परिवाराचा उत्सव,” ही भावना जपत संयुक्त दशावतार २००० मानधन ग्रुप कलाकारांसाठी, माणुसकीसाठी आणि समाजासाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून सिद्ध केले.







