मालवण, प्रतिनिधी : मालवण शहरातील बाजारपेठेत भरदिवसा बँक ऑफ इंडिया समोर उभी केलेली ॲक्टिव्हा दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बाजारपेठ परिसरात खळबळ उडाली असून, संशयित व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मालवण येथील मिनू देऊलवर आणि त्यांचे वडील रवींद्र देऊलकर हे एमएच-15-9940 क्रमांकाची ॲक्टिव्हा दुचाकी घेऊन कामानिमित्त बँक ऑफ इंडिया येथे आले होते. त्यांनी दुचाकी बँकेसमोर रस्त्याच्या कडेला उभी करून बँकेत प्रवेश केला. काही वेळाने काम आटोपून बाहेर आल्यानंतर दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यानंतर बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली असता, एका अज्ञात व्यक्तीने संबंधित ॲक्टिव्हा घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसून आले. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असून, नागरिकांनी एमएच-15-9940 क्रमांकाची ॲक्टिव्हा कुठेही आढळल्यास 7420823440 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन देऊलकर कुटुंबीयांनी केले आहे.





