मुंबई : राज्यातील मत्स्यसंपदेचे संवर्धन, माशांच्या प्रजननाला चालना तसेच पावसाळ्यातील खराब हवामानात मच्छीमारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राज्य शासनाने पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांसाठी बंदीचा कालावधी १ जून ते १५ ऑगस्ट असा राहणार असल्याची घोषणा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.
यापूर्वी राज्याच्या जलक्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या कालावधीत मासेमारीवर बंदी लागू होती. पश्चिम मान्सूनचे आगमन, मत्स्यसाठ्याचे संरक्षण आणि मच्छीमारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा कालावधी निश्चित करण्यात आला होता.
मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच लहान माशांची मोठ्या प्रमाणात होणारी मासेमारी रोखण्यासाठी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याची मागणी विविध मच्छीमार सहकारी संस्थांकडून करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हास्तरीय समित्या तसेच राज्य सल्लागार व सनियंत्रण समितीचे अहवाल मागविण्यात आले. या दोन्ही समित्यांनीही बंदीचा कालावधी वाढविण्यास अनुकूल अभिप्राय दिल्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे मत्स्यसाठ्याचे जतन व संवर्धन होण्यास मदत होईल, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी उपलब्ध होईल आणि भविष्यातील मत्स्यसंपदा अधिक सक्षमपणे टिकवून ठेवता येईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले. तसेच पावसाळ्याच्या प्रारंभी येणारे वादळी वारे, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे होणारी संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासही या निर्णयाची मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्रात बंदी लागू असताना इतर राज्यांतील मासेमारी नौका राज्याच्या किनारपट्टीवर येऊन अनधिकृत मासेमारी करत असल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध मत्स्य विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत दिला.







