अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून गेल्या महिन्याभरापासून प्रतिबंधित अन्नपदार्थ पान मसाला, गुटखा विक्री, वितरण, वाहतूक या विरोधात कठोर कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे अन्न आणि औषध प्रसासनाने 25 मे 24 मे या महिन्याभराचा कालावधीत तब्बल 904 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. या धाडीत तब्बल 34 कोटी 66 लाख, 90 हजार 624 रुपयांचा गुटखा आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत आतापर्यंत एकूण 457 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 322 आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. यासोबतच 42 वाहन जप्त करण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी 25 मे ते 24 जून दरम्यान मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या विभागात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध कारवाई केली. त्यामध्ये कोकण विभागात 155 आस्थापनाविरुद्ध कारवाई करून २८,७७,२०२ रु. किमतीचा माल, जप्त करण्यात आला. तसेच या कारवाईत १५६ व्यक्तींस अटक करण्यात आली आहे. मुंबई विभागात ९० आस्थापनाविरुद्ध कारवाई करून ३९,०२,५३५ रु. किमतीचा माल, जप्त करण्यात आला आणि ८९ व्यक्तींस अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनातर्फे महाराष्ट्र राज्यात कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करून अनारोग्यदायी व अस्वच्छ वातावरणात अन्न पदार्थ उत्पादन करणाऱ्या आस्थापनांविरोधात धडक मोहिम राबविण्यात येत असून सदर मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकून संबंधित अन्न व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
सदर अन्नपदार्थाच्या प्रकरणी ४३१ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून आंबे, दुध व दुग्धजन्य पदार्थ, Ready to serve fruit beverages, रंगमिश्रीत सुपारी, चहा पावडर, पॅकेज्ड पिण्याचे पाणी, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, गुळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईसक्रिम/कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाल्याचे पदार्थ इत्यादेि अन्न पदार्थ तसेच भेसळकारी पदार्थ म्हणून वापरण्यात येणारे अन्न पदार्थाचा सुमारे २९,११,८५,३३०/- रुपये किमतीचा २२.०४,१८२ किलो इतका साठा अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आला आहे. तसेच अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे.







