मालवण | प्रतिनिधी
मालवणच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी ओंकार विकास गावकर यांनी केली आहे. पुण्यातील एमआयटी (MIT) – स्कूल ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शनच्या पदवी परीक्षेत त्यांनी संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड मेडल पटकावले आहे.
एमआयटीने नुकताच पदवी परीक्षेचा निकाल जाहीर केला. या निकालात ओंकार गावकर यांनी उत्कृष्ट गुणवत्तेच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्याने या प्रतिष्ठित संस्थेत अव्वल स्थान मिळवत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
ओंकार गावकर यांनी यापूर्वीही शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने यश संपादन केले आहे. त्यांनी पुण्यातील एम.आय.टी. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून डिप्लोमा शिक्षण पूर्ण करतानाही प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर पदवी शिक्षणासाठी एमआयटीमध्ये प्रवेश घेत त्यांनी ही उज्ज्वल परंपरा कायम राखत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले.
पदवी परीक्षेत त्यांनी १० पैकी ९.६७ सीजीपीए गुण मिळवत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. डिप्लोमा आणि पदवी या दोन्ही अभ्यासक्रमांत प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवणारे ते आपल्या महाविद्यालयातील मोजक्या विद्यार्थ्यांपैकी एक ठरले आहेत.
ओंकार गावकर यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या या यशामुळे मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.







