मालवण
हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण सणांपैकी एक असलेल्या वटपौर्णिमा उत्सव उद्या सोमवारी साजरा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मालवण शहरातील बाजारपेठेला चैतन्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सणासाठी आवश्यक पूजेचे साहित्य, फळफळावळ, फुले, वडाच्या फांद्या नाडापूडी तसेच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
विशेषतः मालवणी मुलखात वटपौर्णिमेला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. सुवासिनी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करून व्रत पाळतात. त्यामुळे सणाच्या आदल्या दिवसापासूनच खरेदीसाठी बाजारपेठ गजबजून गेली आहे.
बाजारात फणस, आंबे, केळी, नारळ, अननस, तसेच इतर हंगामी फळफळावळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून ग्राहकांकडून त्याला चांगली मागणी आहे. पूजेसाठी लागणारे फुलांचे हार, पूजासाहित्य, अगरबत्ती, हळद-कुंकू, बांगड्या आणि पारंपरिक वस्तूंचीही विक्री वाढली आहे.
महिलांनी उत्साहाने खरेदी करत सणाच्या तयारीला अंतिम स्वरूप दिले असून, वाढत्या ग्राहकांमुळे व्यापाऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने मालवण बाजारपेठेत सध्या सर्वत्र सणाचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.







