मालवण : मालवण येथील राजकोट परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिमाखदार पुतळ्याजवळ कोईंबतूर येथील प्रसिद्ध ‘आदियोगी शिवा’च्या धर्तीवर भव्य साउंड आणि लेझर शो सुरू करण्यात यावा, अशी मागणी मालवण नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी भाजपाचे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आमदार प्रमोद जठार यांनी तातडीने पुढाकार घेत इतिहास अभ्यासिका डॉ. ज्योती तोरसकर यांना या प्रस्तावित लेझर शोची संहिता तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
सध्या मालवण आणि परिसरातील सिंधुदुर्ग, राजकोट, पदमगड आणि सर्जेकोट या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर पर्यटन व्यवसायाला चालना मिळून रोजगारनिर्मितीलाही हातभार लागत आहे. देशातील विविध पर्यटनस्थळांवर साउंड आणि लेझर शो पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत असून, त्याच धर्तीवर राजकोट येथेही असा शो सुरू झाल्यास मालवणच्या पर्यटन वैभवात मोठी भर पडेल, असा विश्वास रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि मराठा साम्राज्याचा गौरव आजच्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. साउंड आणि लेझर शोच्या माध्यमातून शिवप्रेमी आणि पर्यटकांना इतिहासाचे जिवंत दर्शन घडेल, तसेच सिंधुदुर्ग परिसराच्या ऐतिहासिक वारशाची माहिती आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रभावीपणे सादर करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
आमदार प्रमोद जठार हे गड-किल्ले संवर्धन आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. यापूर्वीही त्यांच्या माध्यमातून विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्यांवर विविध रचनात्मक उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यामुळे या नव्या संकल्पनेलाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मालवणच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.







