मालवण : यंदाचा मासेमारी हंगाम संपण्यास अवघे सहा दिवस शिल्लक असताना मालवण किनारपट्टीवर बेकायदेशीर एलईडी मासेमारी राजरोसपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप पारंपारिक मच्छीमारांनी केला आहे. स्थानिक मच्छीमारांच्या बोटी किनाऱ्यावर काढण्यात येत असल्याचा फायदा घेत एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौका किनाऱ्यालगत सक्रिय असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
पारंपारिक मच्छीमार रश्मीन रोगे यांनी मत्स्यव्यवसाय विभागावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “किनाऱ्यावरून आम्हाला एलईडी मासेमारी करणाऱ्या नौका स्पष्ट दिसत आहेत, मग मत्स्य अधिकाऱ्यांना त्या का दिसत नाहीत?” असा सवाल उपस्थित केला. “मत्स्य विभागाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. जर एलईडी मासेमारीविरोधात कारवाईसाठी विभागाला आमची मदत हवी असेल, तर आम्ही जीवाची पर्वा न करता भर समुद्रात अधिकाऱ्यांसोबत जाण्यास तयार आहोत,” असा इशाराही त्यांनी दिला.
मालवणच्या समुद्रात गेल्या अनेक दिवसांपासून एलईडी मासेमारी सुरू असल्याचे सांगत पारंपारिक मच्छीमारांनी संबंधित नौकांचे फोटो प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून दिले आहेत. मत्स्यव्यवसाय विभाग केवळ वरिष्ठ अधिकारी आणि मत्स्यमंत्री यांना खुश करण्यासाठी कारवाईची आश्वासने देत असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप रोगे यांनी केला.
पर्ससीन मासेमारीसाठी अधिकृत परवाने किती दिले आहेत, याची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. पर्ससीन मासेमारीला ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत परवानगी असताना १ जानेवारी ते ३१ मे या बंदी कालावधीत राज्य सरकार आणि मत्स्य विभाग नेमकी कोणती कारवाई करतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “राज्य सरकारने साडेबावीस फेंदमपर्यंत मासेमारीवर बंदी घातली असताना एलईडीच्या बोटी गेल्या सव्वा महिन्यापासून खुलेआम लँडिंग करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच, ज्यांच्याकडे परवाना नाही अशा बोटी बंदरात जाळी ठेवून काय करतात, असा सवाल करत स्थानिक मच्छीमारांच्या बोटीवर कारवाई करूनही पुढे कोणतीही कार्यवाही न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “दर महिन्याला अधिकाऱ्यांना विचारावं लागतं की कारवाई का होत नाही,” असे सांगत पारंपारिक मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.







