मालवण, दि प्रतिनिधी
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची सद्याची जलवाहतूक पॉलिसी कोकणातील जलपर्यटन व्यवसायासाठी अत्यंत घातक ठरत आहे. इंग्रज काळापासून चालत आलेल्या ‘इंडियन व्हेसल्स ऍक्ट १९१७’ मधील जुन्या नियमांचा दाखला देत दरवर्षी २५ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जलवाहतुकीवर सरसकट बंदी घातली जाते. मात्र, गेल्या १५ वर्षांतील स्थानिक किनारपट्टीचे हवामान आणि पर्यटन बोटींची स्थिती लक्षात घेऊन, स्थानिक व्यावसायिकांना विश्वासात घेऊन या नियमात बदल करणे ही काळाची गरज आहे, अशी मागणी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, खोल समुद्रातून प्रवास करणाऱ्या मोठ्या कार्गो किंवा प्रवासी जहाजांना पावसाळी हवामानामुळे सुरक्षित बंदर गाठणे कठीण होते. त्यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी बंदीचा नियम योग्य आहे, हे मान्य आहे. परंतु, हाच नियम सरसकट लावून किनारपट्टीला लागून तसेच नदी आणि खाडी पात्रात जलपर्यटन करणाऱ्या स्थानिक छोट्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद करणे संयुक्तिक नाही. ऐन पर्यटन हंगाम बहरलेला असताना समुद्री वातावरणाचा कोणताही प्रत्यक्ष अंदाज न घेता २५ मे पासून व्यवसाय बंद पाडणे अन्यायकारक आहे.
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला असून, येथे अनेक जलपर्यटन पॉलिसी बनवण्याचे काम सुरू आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने गेली ४ ते ५ वर्षे या संदर्भात सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.
गेली अनेक वर्षे मे महिन्यात खराब हवामान आणि वादळांमुळे २५ मे पूर्वीच सागरी पर्यटन स्थानिक व्यावसायिकांना स्वतःहून बंद करावे लागत होते. परंतु, अनेक वर्षांनंतर यंदाच्या मे महिन्यात निसर्गाची चांगली साथ लाभली आहे. सध्या समुद्र आणि किनारपट्टीवरील वातावरण उत्तम असल्याने कोकण किनारपट्टीवर जलपर्यटनासह इतर पूरक व्यावसायिकांचा व्यापारही तेजीत सुरू आहे. अशा चांगल्या स्थितीत अचानक बंदी लागू केल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होऊन स्थानिकांचे मोठे नुकसान होईल.
राज्य सरकारने या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. किनारपट्टीवरील प्रत्यक्ष वातावरणाचा अंदाज घेऊन सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक आणि स्कुबा डायव्हिंगसह वॉटर स्पोर्ट्स व्यवसायासाठी २५ मे ची मुदत वाढवून ती १० जूनपर्यंत करण्यात यावी. ही मुदतवाढ देताना २५ मे नंतरच्या हवामानाचा अंदाज घेऊन २-२ दिवसांच्या टप्प्याटप्प्याने ती वाढवावी, अशी मागणी मोंडकर यांनी केली आहे.
कोकणातील पर्यटन वाढीसाठी इंग्रज काळापासून चालत आलेला ‘इंडियन व्हेसल्स ऍक्ट १९१७’ स्वतंत्र भारताच्या आणि आजच्या काळाच्या गरजेनुसार बदलणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपूर्ण पर्यटन हे जलपर्यटनावर अवलंबून आहे. जर २५ मे रोजीच किल्ला आणि वॉटर स्पोर्ट्स बंद झाले, तर जिल्ह्यात येणारा पर्यटक इतर राज्यांत किंवा अन्य पर्यटनस्थळांकडे वळेल. यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण पर्यटन व्यवस्था विस्कळीत होईल. त्यामुळे राज्य सरकारने या संकटसमयी स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन विष्णू मोंडकर यांनी केले आहे.







