मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिरात अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याच्या पूर्वसंध्येला संपूर्ण परिसर कृष्णचैतन्याने भारावून गेला. रविवार, २४ मे २०२६ ते रविवार, ३१ मे २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा सप्ताह सोहळा संपन्न होणार असून, त्याची भक्तिमय सुरुवात कृष्णमूर्तीच्या भव्य आगमन मिरवणुकीने झाली.
पुरोहित, भागवत भक्त, गावकर, मानकरी, सेवेकरी तसेच बाळगोपाळांच्या उपस्थितीत श्री देव नारायण मंदिर प्रांगणात सजविण्यात आलेल्या ‘कृष्णनगरी’त कृष्णमूर्तीचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. मालवण शहराच्या प्रवेशद्वारावरील जरिमरी मातेच्या मंदिरापासून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
जरिमरी मातेच्या मंदिरापासून मुख्य मार्गाने कुंभारमाठ, ऑक्ट्राय नाका, देऊळवाडा महापुरुष मंदिर मार्गे ही मिरवणूक श्री देव नारायण मंदिरात दाखल झाली. मंदिर प्रांगणात आगमन होताच सुवासिनींच्या हस्ते कृष्णमूर्तीचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर ग्रंथ दिंडीद्वारे मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली.
या सप्ताह सोहळ्यानिमित्त दररोज सकाळी ८ ते १२ या वेळेत श्रीमद् भागवत महापुराणाचे संस्कृतमध्ये संहिता वाचन, श्री विष्णू देवतेस सहस्र तुलसीदल अर्पण पूजाविधी, सुवासिनींच्या हस्ते सहस्र नामावलीसह देवीला कुंकूमार्चन तसेच आयोजकांकडून ५ ते ९ वर्षे वयोगटातील कुमारिकांचे पूजन असे विविध धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व विधी संपूर्णपणे निःशुल्क असणार आहेत.
तसेच पुणे येथील सुप्रसिद्ध निरुपणकार श्री. प्रणव गोखले यांचे दररोज सायंकाळी ४:३० ते ८:३० या वेळेत श्रीमद् भागवत महापुराणातील कृष्णलीलांवर मराठीतून निरूपण होणार आहे.
या श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्यात सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक भागवत भक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सोहळ्यास मालवण ग्रामदेवतांचे आशीर्वाद, देवस्थान संबंधित विश्वस्त, मान्यवर, समस्त गांवकर मंडळी यांचे सहकार्य तसेच बाळगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
दरम्यान, श्री देव नारायण मंदिर प्रांगणात साकारत असलेली आकर्षक ‘कृष्णनगरी’ आणि भक्तिमय वातावरणामुळे मालवण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या संकल्पनेला मिळणारा प्रतिसाद पाहून आयोजक आणि भागवत भक्तांमध्ये विशेष समाधान व्यक्त करण्यात येत आहे.







