मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्याला आज सायंकाळी वादळी वारा आणि काही ठिकाणी पावसाने झोडपून काढले. सायंकाळी जोरदारपणे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तसेच वाऱ्याने नुकसानही झाले. तर काही ठिकाणी पावसानेही हजेरी लावली. आचरा येथे वादळी वाऱ्याने घरांच्या छप्पराचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले.
गुरुवारी सायंकाळी मालवण शहरासह तालुक्यात पावसाळी ढग दाटून येऊन वादळी वाऱ्याने दणादाण उडवली. वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. यामुळे रस्त्यांवर पादचारी, वाहनचालक, दुकानदार यांची धांदल उडाली. वाऱ्यामुळे माडाची झाडे व इतर झाडे जोराने हेलकावू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी वाऱ्यामुळे घरांच्या छप्पराचे पत्रे उडाले, तसेच इतर नुकसान झाले. तर काही ठिकाणी अवकाळी पावसानेही हजेरी लावली. पोईप विरण परिसरात अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे मालवण मधील किल्ला होडी वाहतूक व वॉटरस्पोर्ट्स देखील लवकर आवरते घ्यावे लागले.
आचरा परीसराला जोरदार वाऱ्याने तडाखा दिला. आचरा बाजारपेठ येथील अमोल इलेक्ट्रानिक दुकानाच्या छप्पराचा पत्रा उचकटून गेला होता. काही ठिकाणी झाडे उन्मळून मोडून पडल्याचे दिसून येत होते.समर्थ नगर येथील विष्णू केळकर यांच्या घराच्या छप्पराचे पत्रे उडल्याने मोठे नुकसान झाले. या वेळी घरात राहणारे अविनाश महाजन यांचे कुटूंब तसेच रंगकाम करण्यासाठी गेलेले चंदू आडवलकर आणि त्यांचा मुलगा सुदैवाने बचावले. मात्र छप्पराचे सिमेंट पत्रे उडून मोठे नुकसान झाले.







