
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील लाखो दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उद्या (दि. ८ मे) इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून यावर्षी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) घेण्यात आली होती.
यापूर्वी २ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचेही लक्ष लागले होते. उद्या विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण ऑनलाईन उपलब्ध होणार असून निकालाची प्रत (प्रिंट) देखील घेता येणार आहे.
या संकेतस्थळावर मिळेल अतिरिक्त माहिती-
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
- www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार असून निकालाबाबतचा अन्य तपशील उपलब्ध होईल.
गुणांची पडताळणीही करता येणार…
निकालानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) इतर कोणत्याही विशिष्ट विषयांत विद्यार्थ्याला गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन किंवा स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने स्वतः किंवा शाळामार्फत अर्ज करता येईल. हा अर्ज मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahahsccboard.in यावर करता येईल. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी ९ मे ते २३ मे पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.








