नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी (२०२६) आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून, यात निष्ठावंत कार्यकर्ते व अनुभवी नेते प्रमोद शांताराम जठार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षात निष्ठावंतांना योग्य सन्मान मिळत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने पाच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले.
जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये सुनील विनायक कर्जतकर, श्रीमती माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे, प्रमोद शांताराम जठार आणि प्रज्ञा सातव यांचा समावेश आहे.
या यादीत राज्यातील विविध भागांतील अनुभवी व संघटनात्मकदृष्ट्या मजबूत नेत्यांना संधी देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने ही नावे निश्चित केली असून, या माध्यमातून राज्यातील राजकीय समीकरणे अधिक बळकट करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रमोद जठार यांना मिळालेली उमेदवारी ही त्यांच्या दीर्घकालीन पक्षनिष्ठा आणि कार्याची दखल मानली जात असून, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.







