मालवण तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील विविध प्रश्न आजच्या आमसभेत मांडण्यात आले. या आमसभेत चर्चिलेले विषय केवळ सभेपूरते मर्यादित न राहता त्यावर ठोस तोडगा काढून संबंधित प्रश्नांचे निवारण झाले पाहिजे. यासाठी अधिकारी वर्गाने कामांचा टाईम-बाउंड निकाल लावावा, असा सज्जड दम आमदार निलेश राणे यांनी भरला. तसेच, ही आमसभा नऊ वर्षांनी होत असली तरी यापुढे दरवर्षी आमसभा आयोजित केली जाणार असून, पुढील वर्षी आजच्या आमसभेतील इतिवृत्तावर सभेपूर्वीच चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणतेही कारण न देता अधिकारी वर्गाने प्रश्नांचे निवारण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मालवण येथील नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा पार पडली. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती प्रज्ञा चव्हाण, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, उपसभापती घनश्याम झाड, तहसीलदार गणेश लव्हे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, जिल्हा परिषद सदस्य दिपलक्ष्मी पडते, सुमेधा पाताडे, अक्षता गावडे, वर्षा सांबारी यांच्यासह अन्य जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून आमदार निलेश राणे बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील विकासकामे रोज अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य नसल्याने ही आमसभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मांडण्यात आलेले विकास विषयक प्रश्न काही दिवसांत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिकारी वर्ग यावा आणि आलेल्या अधिकाऱ्यांनी बदली मागू नये, यासाठी चांगले वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचे मान्य करत त्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत विशेषतः या मतदारसंघात कामे झाली नाहीत. आता नितेश राणे पालकमंत्री म्हणून चांगल्या पद्धतीने काम करत असून, यापुढे अधिकारी वर्गाची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. अधिकाऱ्यांना सोपवलेली कामे टाईम-बाउंड पद्धतीने पूर्ण करावीत, असा सज्जड दमही त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, “मी आमदार आहे, तसेच खासदार नारायणराव राणे आणि पालकमंत्री नितेश राणे हेही आपलेच असल्यामुळे विकासकामे अडून राहणार नाहीत. आमचे जेवढे उत्तरदायित्व आहे, तेवढेच तुमचेही आहे. विकासकामे करताना कोणतेही गैरकृत्य होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.” 2014 नंतर मालवण-कुडाळ मतदारसंघ दहा वर्षे मागे पडला होता. त्या काळात कोणतेही आराखडे तयार झाले नाहीत किंवा निधीची तरतूद झाली नव्हती. मात्र, आता या मतदारसंघासाठी निधी उपलब्ध होत असून, तो योग्य पद्धतीने खर्च करून अपेक्षित कामे पूर्ण करावीत. तळागाळात जाऊन काम करत असल्याने लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची जबाबदारी आमदार म्हणून माझ्यावर आहे; त्यामुळे विकासकामांबाबत अधिकाऱ्यांनाही उत्तरदायित्व स्वीकारावे लागेल. त्यामुळे सर्वांनी तत्काळ कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.







