ठाणे येथील कोराम मॉल येथे पार पडलेल्या “The Pink Pageant 11.11 World Record Award 2026” या भव्य मॉडेलिंग स्पर्धेत साताऱ्याची आराध्या निखिल खटावकर हिने आपल्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशभरातील सुमारे ११०० मॉडेल्सच्या सहभागात झालेल्या या स्पर्धेत आराध्याची कामगिरी विशेष ठरली.
आराध्याने “देवी आई महालक्ष्मी” या संकल्पनेवर आधारित आकर्षक आणि प्रभावी सादरीकरण करत परीक्षकांची मने जिंकली. तिच्या अनोख्या कल्पकतेमुळे तिला “बेस्ट क्रिएटिव्ह डिझायनर” हा मानाचा किताबही बहाल करण्यात आला.
या स्पर्धेत विविध थीम्सवर सादरीकरणे झाली, मात्र आराध्याच्या वेशभूषा, सादरीकरणातील आत्मविश्वास आणि सांस्कृतिक मांडणीने विशेष लक्ष वेधून घेतले. त्यामुळे तिने स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत आपल्या नावाचा ठसा उमटवला.
आराध्याचा या स्पर्धेतील सहभाग सोनल म्हात्रे (करुणाम फॅशन) यांच्या मार्गदर्शनाखाली झाला होता. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
आराध्याच्या या उल्लेखनीय यशामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.







