मालवण (प्रतिनिधी)
कालावल खाडीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशा विरोधात आंदोलन छेडणाऱ्या तळाशीलच्या ग्रामस्थांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सोमवारी आंदोलन स्थळी भेट घेऊन चर्चा केली. आम्ही सर्व ग्रामस्थांच्या सोबत आहोत. ग्रामस्थांच्या मागण्या व ग्रामस्थांची भूमिका आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पोहोचवली जाईल. ग्रामस्थांना न्याय देण्याच्या दृष्टीने योग्य ती भूमिका घेतली जाईल. प्रशासन स्तरावरूनही योग्य ती कारवाई होईल, अशी भूमिका दत्ता सामंत यांनी यावेळी मांडली.
यावेळी तळाशील ग्राम विकास मंडळ यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने दत्ता सामंत यांना देण्यात आले. यावेळी जयहरी कोचरेकर, तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळूसकर, अजित केणी, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, जिल्हापरिषद सदस्य वर्षा सांबारी, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर, बंडू चव्हाण, भाऊ मोरजे, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, जयप्रकाश परुळेकर यांसह अन्य पदाधिकारी तसेच आंदोलनकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी तळाशील ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांच्यासमोर कैफियत मांडली. तळाशील गावच्या समोरील रेवंडी कालावल खाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफीयांनी धुमाकूळ घातला आहे. या अवैध प्रकारामुळे केवळ पर्यावरणाचे नव्हे तर तळाशील गावच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही आंदोलन सुरू केले त्यावेळी काही अवैध वाळू उत्खनन बोटी अगदी समोरच होत्या. त्यावेळी प्रशासकीय अधिकारी यंत्रणाही होते प्रशासनाला सांगूनही त्यांच्यावर योग्य ती कारवाई अद्याप झाली नाही. उलट आम्हालाच त्रास दिला जात आहे. मासेमारी हा आमचा पारंपारिक व्यवसाय आहे तळाशील होडीने आमच्या मत्स्य विक्रेत्या महिला व व्यवसाय मिळालेले मासे घेऊन मालवण येथे विक्रीसाठी नेतात. मात्र रेवंडी येथील जेटीवर मासे उतरवण्यास व तेथून प्रवास करण्यास अटकाव केला जात आहे. जेटीचा वापर करू नये असे सांगितले जात आहे. रेवंडी गावचे सरपंचही अशाच प्रकारची भूमिका घेत आहेत. याचा मोठा परिणाम आमच्या रोजीरोटीचा व्यवसाय असलेल्या मासेमारी व्यवसायावर होत आहे. तर दुसरीकडे अनधिकृतपणे सुरू असलेल्या वाळू उत्खननामुळे तळाशील गावच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. सर्व किनाऱ्याच्या बाजूने माती खचत असून माड बागायती तसेच अनेक घरांनाही धोका निर्माण होत आहे. हे सर्व होत असताना काहीजण अनधिकृत वाळू व्यवसायिकांची बाजू घेत असल्याचे समोर आले आहे. यालाही आमचा विरोध असून अशा प्रवृत्तींना आमचा ठाम विरोध आहे. प्रशासनाने अनधिकृत वाळू उपसा बाबत तसेच अनधिकृत वाळू उपशाच्या ज्या बोटीची आम्ही माहिती दिली त्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी भूमिका यावेळी तळाशील ग्रामस्थांनी मांडली.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ ग्रामस्थ जयहरी कोचरेकर यांनीही भूमिका मांडली. कालावल खाडीतील बंदी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा सुरू असून त्यामुळे तळाशील वाडीला धोका निर्माण होऊन वाडी वाहून जाण्याची भीती आहे. हा संघर्ष अस्तित्वासाठी आहे. अनधिकृत वाळू उपशावर कारवाई साठी आहे. प्रशासन स्तरावरून योग्य ती कठोर कारवाई व्हावी यासाठी आपण लक्ष द्यावे, असे यावेळी कोचरेकर म्हणाले.
यावेळी दत्ता सामंत म्हणाले, आम्ही ग्रामस्थांच्या सोबत आहोत आमदार निलेश राणे पालकमंत्री नितेश यांच्याकडे ग्रामस्थांचे निवेदन पोचवले जाईल. प्रशासन स्तरावरून निश्चितच योग्य ती कारवाई होईल. तसेच रेवंडी जेटीवरून मासे विक्रेत्या महिला व व्यावसायिकांना जाण्यास अटकाव होत असल्याबाबत बंदर अधिकाऱ्यांना माहिती देऊन योग्य ती भूमिका घेण्याबाबत सांगितले आहे, असेही दत्ता सामंत म्हणाले.







