मालवण : आधुनिक संगीत क्षेत्रात वेगाने लोकप्रिय होत असलेल्या बीटबॉक्सिंग या कलेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मालवण येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. युवक-युवतींसाठी करिअरचा नवा पर्याय म्हणून या कलेकडे पाहिले जात असून, या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
बीटबॉक्सिंग ही तोंड, ओठ, जीभ आणि आवाज यांच्या सहाय्याने ड्रम बीट्स, ताल आणि संगीत निर्माण करण्याची अनोखी कला आहे. कोणत्याही वाद्यांशिवाय “मानवी ड्रम मशीन”प्रमाणे सादरीकरण करता येत असल्याने या कलेला विशेष आकर्षण आहे.
ही दोन तासांची कार्यशाळा बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे बुधवार, 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे. या कार्यशाळेत प्रसिद्ध बीटबॉक्सर साधना तावडे मार्गदर्शन करणार आहेत.
वडाचा पाट गावच्या मूळ रहिवासी असलेल्या साधना तावडे यांनी मुंबई येथे शिक्षण घेतले असून त्या मुंबईतील पहिल्या महिला बीटबॉक्सर म्हणून ओळखल्या जातात. “हक से हिंदुस्तान” आणि “स्पॉटिफाय रॅप 91” यांसारख्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. महाराष्ट्रातील महिला बीटबॉक्सर्समध्ये त्या टॉप टेनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
या कार्यशाळेत बीटबॉक्सिंगची मूलभूत माहिती, त्यातील करिअरच्या संधी तसेच रोजगाराच्या शक्यता यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मालवण तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ही कार्यशाळा पूर्णपणे विनामूल्य असून इच्छुकांनी आपली नावे व्हॉट्सअॅप क्रमांकासह नोंदवावीत, असे सांगण्यात आले आहे.
नोंदणीसाठी संपर्क :
संजय आचरेकर – 9421569704 / 9423946003
डॉ. सुमेधा नाईक – 9404924678
लक्ष्मीकांत खोबरेकर – 9422434632
कार्यक्रमाचे आयोजन सेवांगण विश्वस्त व कार्यकारिणी मंडळ, धुरीवाडा, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.


