मालवण (प्रतिनिधी)
गेल्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सुरू असलेल्या विनाशकारी एलईडी लाईट मासेमारीमुळे पारंपारिक आणि छोटा मच्छीमार उद्ध्वस्त होत आहे. या एलईडी लाईट मासेमारीच्या ‘भस्मासुरा’ला आवर घालण्यात मत्स्य विभाग अपयशी ठरत असून, सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त लाभलेल्या नौकांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या १० एप्रिल रोजी माजी आमदार वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण येथील मत्स्य विभाग कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उबाठा शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील उबाठा शिवसेना शाखा कार्यालयात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी हरी खोबरेकर यांच्यासमवेत शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, अनिता गिरकर, तालुका संघटक दीपा शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी मेतर, उमेश मांजरेकर, हेमंत मोंडकर, मनोज मोंडकर आदी उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, आज सिंधुदुर्गचे सुपुत्र नितेश राणे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री असतानाही छोट्या मच्छीमारांवर अन्याय होत आहे. एलईडी मासेमारीचे मुख्य केंद्र देवगडमध्ये असूनही तिथल्या बोटींना राजाश्रय दिला जात आहे. एखादी दुसरी नौका पकडून मत्स्य विभाग केवळ वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. यामुळे पारंपरिक मच्छीमार आज कर्जबाजारी झाला असून त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. समुद्रातील मासळी ओरबडणाऱ्या बेकायदेशीर एलईडी नौकांना चाप लावणे गरजेचे आहे. वाढलेल्या डिझेलच्या किमतींमुळे मच्छीमारांचा व्यवसाय तोट्यात जात असून, त्याबाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी, असेही हरी खोबरेकर म्हणाले.
समुद्र हा मच्छिमारांच्या हक्काचा आहे, तो कुणाच्या बापाचा नाही. मूठभर धनदांडग्यांसाठी पारंपारिक मच्छीमारांचा बळी दिला जात असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. एलईडी लाईट मच्छिमारी व मच्छिमारी डिझेल दरवाढी विरोधात १० एप्रिल रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा भरड नाका ते बंदर जेटी, त्यानंतर फोवकांडा पिंपळ मार्गे धुरीवाडा येथील मत्स्य विभाग कार्यालयावर धडकणार आहे. या आंदोलनात सर्व नौका मालक, खलाशी, मासळी विक्रेते, श्रमिक आणि श्रमजीवी मच्छीमार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, आपली ताकद दाखवण्यासाठी सर्व मच्छीमारांनी १० तारखेला रस्त्यावर उतरावे, असे आवाहन श्री. खोबरेकर यांनी केले.







