A free food safety training and certification workshop will be held in Malvan for food business operators. The program is mandatory for license holders to ensure renewal compliance.
मालवण – प्रतिनिधी
मालवण येथे अन्न व खाद्यपदार्थ व्यवसायिकांसाठी महत्त्वपूर्ण अन्नसुरक्षा प्रशिक्षण प्रमाणपत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा विभागामार्फत आणि सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या सहयोगाने ही कार्यशाळा मोफत आयोजित करण्यात आली आहे.
ही कार्यशाळा बुधवार, दि. २५ मार्च रोजी सायंकाळी २.५५ ते ७.०० या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे पार पडणार आहे. अन्न सुरक्षा परवाना धारक तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, अन्न सुरक्षा प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास पुढील काळात अन्न सुरक्षा परवान्याचे नुतनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व परवाना धारकांनी स्वतः व त्यांच्या कर्मचाऱ्यांसह या प्रशिक्षणास उपस्थित राहून प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांनी सर्व संबंधितांनी या मोफत संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.







